मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद उतरला पाक निवडणुकीत; भारताविरुद्ध जिहादची घोषणा | पुढारी

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद उतरला पाक निवडणुकीत; भारताविरुद्ध जिहादची घोषणा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात गुरुवारी (दि. 8) मतदान होत आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) सह पाच मुख्य पक्ष निवडणुकीत उतरलेले आहेत. पाकिस्तान मर्कजी लीगसारख्या पक्षाच्या माध्यमातून मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, आंतरराष्ट्रीय दहशतवादी तसेच जमात उद दावा या कुख्यात संघटनेचा अध्यक्ष मौलाना हाफिज सईद हाही मागच्या दाराने या निवडणुकीत उतरला आहे.

मर्कजी लीग हा पक्ष लष्कर-ए-तोयबाची राजकीय आघाडी असून या पक्षाच्या स्थापनेमागे हाफिज सईदच आहे. मर्कजी लीगची पंजाबातील कसूर येथे सभा झाली. या सभेतून भारताविरुद्ध जिहादची घोषणा करण्यात आली. लष्कर-ए-तोयबा आणि जमात उद दावाशी संबंधित म्होरक्यांनी या पक्षाच्या मंचावरून पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण बदलण्यावर आणि पॅलेस्टाईन व काश्मीरला रसद पुरविण्यावर भर दिला. काश्मीरसाठी भारताविरुद्ध जिहाद हे प्रत्येक मुस्लिमाचे पवित्र कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले. काश्मीर जोवर पाकिस्तानचा भाग बनत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शपथा यावेळी घेण्यात आल्या.

हाफिज सईद कारागृहात, मुलगा निवडणुकीत उमेदवार

हाफिज सईद हा लाहोरच्या एका कारागृहात कैद आहे. टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात त्याला 31 वर्षे कारावासाची शिक्षा झालेली आहे. सईदचा मुलगा तल्हा सईद मर्कजी लीगचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहे. लाहोर एनए-122 मतदारसंघातून तो राष्ट्रीय संसदेसाठी निवडणूक लढवतो आहे. हाफिज सईदचा जावई नेक गुज्जर हाही मर्कजी लीगच्या तिकिटावर मैदानात आहे. तो पंजाब विधानसभेसाठी निवडणूक लढवतोय.

Back to top button