Latest

नवाझ शरीफ कमी बुद्धीचे नेते; इम्रान खान यांचे निकालावर AI ‘विजयी भाषण’

दिनेश चोरगे

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात कोणाचे सरकार स्थापन होणार हे सांगणे कठीण आहे. इम्रान खान, नवाझ शरीफ विजयाचा दावा करत आहेत. मात्र, अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर झालेला नाही. सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या टीकेदरम्यान, माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान यांनी शनिवारी त्यांचे एआय-आधारित 'विजय भाषण' जारी केले. या भाषणात इम्रान यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) सुप्रीमो नवाझ शरीफ यांचा 'लंडन प्लॅन' मतदारांच्या प्रचंड मतदानामुळे अयशस्वी झाल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानात सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इम्रान खान यांना पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यांना ९८ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ला ६९ जागा मिळाल्या, तर पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५१ जागा मिळाल्या. पाकिस्तानात सत्तेबाबत रात्रभर बैठकांचे सत्र सुरू आहे. नवाझ शरीफ यांनी प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आहे.

संसदेत एकूण 336 जागा आहेत. 265 जागांसाठी मतदान झाले. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 133 आहे. महत्त्वाचे म्हणजे कारागृहात असूनही, पक्षाची मान्यता रद्द होऊनही, बॅट हे निवडणूक चिन्ह गोठविण्यात आल्यानंतरही… इम्रान खान यांचे उमेदवार देशभरात अपक्ष म्हणून उभे राहिले होते. याउपर त्यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे. इम्रान बाहेर असते, पक्ष म्हणून निवडणूक लढले असते आणि बॅट हे चिन्ह असते तर त्यांनी विरोधी पक्षांना तगडी पछाड दिली असती, असे मानले जात आहे.

पाकिस्तानात मुख्यत्वे तीन पक्षांमध्ये चुरस आहे. नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (एन), पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय/प्रत्यक्षात अपक्ष) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी. संसदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून अपक्ष अर्थात पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ समोर आल्यानंतर निकालाअंती तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची भूमिका मोलाची ठरणार आहे. अर्थात पाकिस्तानचे लष्कर काय भूमिका बजावते, त्यावरही बरेच काही अवलंबून असेल. इम्रान यांच्या अनेक विजयी अपक्ष उमेदवारांना आपल्या कलाने मतदान करण्यास लष्कर भाग पाडू शकते, अशी भीती आधीपासूनच वर्तविली जात आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा मुलगा तल्हा हाफिज पराभूत झाला आहे. तो मर्कजी लीगचा उमेदवार होता. इम्रान समर्थक अपक्षाने त्याचा पराभव केला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT