इम्रान खान यांची आघाडी; बिलावल किंगमेकर? | पुढारी

इम्रान खान यांची आघाडी; बिलावल किंगमेकर?

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तान राष्ट्रीय संसदेसह प्रांतीय विधानसभांसाठी मतदान आटोपल्यानंतर मोजणी सुरू झाली. पण निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करायला तब्बल 18 तासांवर उशीर केला. शुक्रवारी रात्री दहापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार निकाल जाहीर झालेल्या 233 मतदारसंघांपैकी 95 जागांवर इम्रान खान यांच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. नवाज शरीफ यांच्या पक्षाने 64 जागा जिंकल्या आहेत. भुट्टोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे 51 उमेदवार विजयी झाले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो किंगमेकर ठरू शकतात. दुसरीकडे लष्कराकडून इम्रान यांच्या विजयी अपक्षांना नवाज शरीफ यांच्या गोटात वळविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचेही वृत्त आहे.

संसदेत एकूण 336 जागा आहेत. 265 जागांसाठी मतदान झाले. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 133 आहे.
पाकिस्तानात मुख्यत्वे तीन पक्षांमध्ये चुरस आहे. नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (एन), पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय/प्रत्यक्षात अपक्ष) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी. संसदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून अपक्ष अर्थात पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ समोर आल्यानंतर निकालाअंती तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची भूमिका मोलाची ठरणार आहे. अर्थात पाकिस्तानचे लष्कर काय भूमिका बजावते, त्यावरही बरेच काही अवलंबून असेल.

शुक्रवारी पहाटे पहिला निकाल जाहीर झाल्यानंतर रात्री 10.00 पर्यंत जवळपास 233 जागांचे निकाल समोर आलेले आहेत. इम्रान यांनी 95 जागा जिंकलेल्या आहेत. नवाज शरीफ यांच्या पक्षाने 64 जागा जिंकल्या आहेत. भुट्टोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे 51 उमेदवार विजयी झाले आहेत. जेयूआय-एफ आणि अन्य पक्षांचे 23 उमेदवार विजयी झालेले आहेत.

शरीफ : एक जय, एक पराजय

लाहोरमधील एनए-130 मतदारसंघातून माजी पंतप्रधान नवाज शरीफ विजयी झाले आहेत. ते दोन जागांवर उभे होते. मनसेहरातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बेनझिराबाद मतदारसंघातून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते तसेच बिलावल भुट्टो यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी इम्रान समर्थक सरदार शेर मुहम्मद रिंद बलोच या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. बिलावल भुट्टो शाहदादकोट मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा मुलगा तल्हा हाफिज पराभूत झाला आहे.

Back to top button