पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. असे असले तरी आमची या पक्षांशी मैत्री कायम आहे. निवडणुकीनंतर संधी मिळाल्यास दोन्ही पक्षांसोबत काम करण्याचा काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी रविवारी व्यक्त केले. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारणात जोरदार रंग भरू लागला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी घरोघरी जाऊन प्रचार केला. तर, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न होऊ शकल्याच्या मुद्द्यावर वरील वक्तव्य केले आहे. मुख्य लढत ही काँग्रेस – गोवा फॉवर्ड युती आणि सत्ताधारी भाजपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेस युती बहुमताने विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.
दोन्ही पक्षांनी आमच्यासमोर काही प्रस्ताव ठेवले होते. दोन्ही बाजूच्या काही मर्यादा होत्या, हे आपणास मान्य आहे. आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले. तरीही आम्ही सोबत येऊ शकलो नाही. आमची मैत्री आहे आणि ती पुढेही कायम राहील. निवडणुकीच्या निकालानंतर संधी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत काम करण्याचा प्रयत्न करू असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे गोवा दौर्यावर आहेत. त्यांनी रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावर पलटवार केला होता. तो करताना त्यांनी अमित शहा यांनाही टोला लगावला. आता चिदंबरम यांच्या स्पष्टीकरणावर राऊत काय म्हणतात हे पहावे लागेल.