उमरखेड : येथील नगरपरिषदेत पंधरा दिवसांपूर्वी बदली झालेल्या, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची थेट सांगली महापालिकेत प्रतिनियुक्ती तर, याच आदेशान्वये महाबळेश्वर येथील मुख्यधिकाऱ्यांचा प्रभार देण्याचा आदेश नगरविकास मंत्रालयाने काढला आहे. या आदेश नगरविकास मंत्रालयाने ४ मे रोजी जारी केला आहे. नगरविकास मंत्रालयातील अप्पर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या या आपलातून आदेशामुळे उमरखेडकर चकीत झाले आहेत. अशाप्रकारे एखाद्या अधिकार्याची प्रतिनियुक्तीसोबतच अतिरिक्त प्रभार पद कसे काय मिळू शकते ?, याबाबत परिसरात वेगवेगळी चर्चा सुरू आहेत.
उमरखेड येथील मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांना शासनाच्या आदेशान्वये १८ एप्रिलला येथून कार्यमुक्त करण्यात आले. त्याचवेळी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी उमरखेड येथील मुख्याधिकारी म्हणून रुजू व्हावे असे या आदेशात म्हटले होते. परंतु पल्लवी पाटील उमरखेडला आल्याच नाहीत. त्यांनी थेट यवतमाळ येथे जिल्हाधिकार्यालयात रुजू होत, परस्पर रजा घेऊन आल्या पावली रवाना झाल्या. त्यानंतर उमरखेड येथील अधिकाऱ्यांचा रिक्त प्रभार येथील नायब तहसीलदार पाईकराव यांच्याकडे देण्यात आला. परंतु, दरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींनंतर ४ मे रोजी नगरविकास मंत्रालयाने एक आदेश निर्गमित केला. त्यात उमरखेडच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील असा उल्लेख करून त्यांची थेट सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेत करसंकलन व निर्धारक अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती केली. एवढेच नव्हे तर या आदेशात त्यांच्याकडे रिक्त असलेल्या महाबळेश्वर येथील मुख्याधिकाऱ्यांच्या प्रभारही सोपवला आहे.
वास्तविक पाहता, सांगली ते उमरखेड हे अंतर साडेपाचशे किलोमीटर असून, उमरखेड ते महाबळेश्वर अंतर ७५० किलोमीटर आहे. तर सांगली ते महाबळेश्वर हे अंतर २२५ किलोमीटर आहे. या अंतरातील तफावत पाहता, महाबळेश्वरवरून उमरखेडला मुख्यधिकारी म्हणून रुजू होणे हे श्रीमती पाटील यांना कदाचित अवघड झाले असेल. असे गृहीत धरले तरी, उमरखेडवरून त्यांची प्रतिनियुक्ती करावयाची असल्यास, किमान यवतमाळ जिल्ह्यातील किंवा विदर्भातील एखाद्या रिक्त पदाचा प्रभार देणे संयुक्तिक ठरले असते. परंतु, केवळ नगरविकास मंत्रालयाने एखाद्या अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्ती बरोबरच अतिरिक्त प्रभारसारखा असा आफलातून आदेश जारी केला. याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून, येत्या काळात पालिकेची निवडणूक पाहता येथील मुख्याधिकाऱ्यांच्या रिक्त पदासाठी सध्या कोण नसून विदर्भातील उमरखेड सारखी अव्वल नगरपालिका पोरकी झाली आहे. अशी भावना व्यक्त होत आहे.