सातारा : पुढारी वृत्तसेवा; साखर कारखान्यांच्या शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. कारखान्यांचे हंगाम संपत आले असले तरी नजिकचा ऊस तुटावा यासाठी रिकव्हरी लॉस व वाहतुकीचे अनुदान सरकारकडून दिले जात असून, ऊस उत्पादकांचा तोटा होणार नाही याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सातार्यात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, केंद्राच्या संस्थांनी त्यांचे काम करावे. त्याला आमची कोणतीही हरकत नाही. मी अनेक वर्षांपासून साखर कारखान्याच्या व्यवसायाशी संबधित आहे. उसाचे क्षेत्र चांगल्या पावसानामुळे वाढले आहे. शेतकर्यांचे नुकसान होवू नये यासाठी इतर कारखान्यांकडून या उसाचे गाळप करावे यासाठी वाहतूक अनुदान आणि रिकव्हरी लॉस दिला आहे. सरकारकडून अनुदान शेतकर्याला दिले जात आहे. शेतकर्याला चांगला दर मिळाला पाहिजे. त्या-त्या विभागातील ऊस संपवण्यासाठी अधिकार्यांना कामाला लावले आहे.
किसनवीर कारखाना सुरू करण्यासाठी काय करणार? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, किसनवीर कारखान्याचा आढावा घेतला असून कारखान्यावर 906 कोटींचे कर्ज आहे. सोमवारी याबाबत आणखी महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे. कारखान्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यात येणार आहे. किसनवीरच्या कर्जाच्या रकमेत नवीन कारखाने सुरू करता येईल. सत्ताधार्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला त्यामुळेच शेतकर्यांनी त्यांना पराभूत केले. किसनवीर कारखान्याला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 4 महिने शिल्लक आहेत. या कारखान्याचा गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहे. हा माझा विषय नाही हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. या चार महिन्यातच सर्व देणी आणि बँकांचे व्याज द्यावे लागणार आहे.
राज्य सहकारी बँकेचे चेअरमन यातून काही मार्ग सुचवतील. याबाबत ते निर्णय घेवू शकतात. किसनवीर कर्जमुक्तीसाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. अडचणीत सापडलेला किसनवीर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकर्यांना हे भाग भांडवल द्यावचं लागेल. शेतकर्यांचे भागभांडवल असल्याशिवाय कारखाना सुरूच होवू शकणार नाही. शेतकर्यांनी भाग भांडवल उभारल्यानंतर बँका कारखान्याला मदत करतील. सोमवारी महत्वाची बैठक झाल्यानंतर दि. 13 रोजी आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांच्यासह संचालकांना बोलावले आहे. त्यावेळी कोणत्या उपाययोजना करायच्या यावर चर्चा केली जाईल.
भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले, कुणीही कुणाला अल्टीमेटम देण्याच्या भानगडीत पडू नये. संविधानातील कायदे व नियमाला धरूनच सरकार चालत असते. तुम्हाला अल्टीमेटम देण्याचा अधिकार काय? कायदा हातात घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस त्यांचे काम करतील. यापूर्वी काहींनी पोलिसांबद्दल चुकीचे स्टेटमेंट करत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस कायद्यानुसारच वागल्याचे त्यांनी सांगितले.