पुणे (किशोर बरकाले) : उत्तर प्रदेशमधील मैजापूर येथील बलरामपूर चीनी मिलकडून वर्षातील ३५० दिवसांत सुमारे ११.९० कोटी लिटरइतके इथेनॉल (Ethanol) उत्पादन तयार करणारा पहिला प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. त्याद्वारे शंभर टक्के इथेनॉल आणि शून्य टक्के साखर उत्पादनाचा हा प्रकल्प सप्टेंबर २०२२ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा असल्याने या प्रकल्पाबद्दल शुगर इंडस्ट्रीजमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण साखर उद्योगास एक नवी दिशा मिळण्याची आशा आहे.
पुण्यात शनिवारी (दि.५) दुपारी साखर संकुल येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) संचालक मंडळाची बैठक संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत बलरामपूर चीनी मिलकडून इथेनॉल (Ethanol) निर्मितीच्या उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. त्यावर आता साखर उद्योगातून विविध सूचना येण्याची अपेक्षा आहे.
उसाच्या रसापासून सुमारे ५.५० कोटी लिटरइतके इथेनॉलचे उत्पादन १६० दिवसांत तयार करण्यात येणार आहे. खराब धान्यांपासून १५० दिवसांत ५.१० कोटी लिटरइतके इथेनॉल उत्पादन घेतले जाणार आहे, तर मळीपासून ४० दिवसांत सुमारे १.३० कोटी लिटरइतके इथेनॉल उत्पादन घेतले जाणार आहे. म्हणजेच वर्षातील ३६५ दिवसांपैकी तब्बल ३५० दिवसांत एकूण ११.९० कोटी लिटरइतके इथेनॉल उत्पादन घेण्याची तयारी बलरामपूर चीनी मिलने केल्याची माहिती प्रकाश नाईकनवरे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.
व्हीएसआयच्या बैठकीतील सादरीकरणानंतर बलरामपूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनाही इथेनॉल (Ethanol) उत्पादनाची मोठी संधी असून, त्यावर आता साखर उद्योगात सकारात्मक चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात ऊस गाळपाचा हंगाम सरासरी १६० ते १८० दिवसांचा राहतो. म्हणजेच सहा महिनेच आपल्याकडे कारखाने सुरू राहतात आणि सहा महिने बंद राहतात. मात्र, वर्षभर कारखाना सुरू राहिल्यास साखर उद्योगासाठी एक आशादायी चित्र उभे राहणार आहे.
शेतकर्यांना अधिक रक्कम मिळवून देणारा, साखर उद्योग क्षमतेचा पुरेपूर वापर होणारा आणि रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारा असा हा प्रकल्प खरोखरच शुगर इंडस्ट्रीसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर व्हीएसआयच्या पुढील बैठकीत पुन्हा एकदा विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान खराब धान्यांपासून इथेनॉल, नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये शुगरकेन ज्युसपासून इथेनॉल, मे ते जूनपर्यंत मळीपासून इथेनॉल, जून ते नोव्हेंबर खराब धान्यांपासून इथेनॉल उत्पादनाचा बलरामपूरचा प्रकल्प असून महाराष्ट्रातही असे वर्षभर इथेनॉल उत्पादन घेणे शक्य होणार असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.
साखर उत्पादन तयार करून कारखान्यांना राज्य आणि जिल्हा बँकांकडे साखर पोते तारण ठेवून कर्ज उपलब्ध होते. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे हाच व्यवसाय सुरू असल्याने अनेक कारखाने व्याजाच्या ओझ्याखाली दबले, आर्थिक अडचणीत आले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागे कारणे अनेक असतील. मात्र, इथेनॉल पुरवठ्यानंतर ऑईल कंपन्यांकडून ठराविक कालावधीत रक्कम तत्काळ कारखान्यांना मिळते. त्यामुळे साखर उत्पादन न घेता केवळ इथेनॉल उत्पादन घेण्याचा काळानुरूप असलेला ट्रेंड कारखान्यांनी आत्मसात केल्यास साखर तारणावरील बँकांच्या व्याजाचा भुर्दंड संपुष्टात येऊन शुगर इंडस्ट्री खर्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, अशीही चर्चा साखर उद्योगात सुरू आहे.
क्रमांक : कच्चा माल : दिवस : इथेनॉल उत्पादन
१. उसाच्या रसापासून इथेनॉल – १६० – ५.५० कोटी लिटर
२. खराब धान्यांपासून इथेनॉल – १५० – ५. १० कोटी लिटर
३. मळीपासून इथेनॉल – ४० – १ . ३० कोटी लिटर
एकूण : ३५० ः ११.९० कोटी लिटर
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ