पुढारी ऑनलाईन डेस्क :
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड झाली आणि राज्यातील राजकारणात भूकंप आला. साेमवारी मध्यरात्रीपासून राज्यातील राजकीय घडामाेडींना कमालीचा वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर संजय राऊत यांनी माेठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबाेल केला. तसेच एकनाथ शिंदेशी संपर्क झालेला नाही. यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली असून, शिंदेंशी संपर्क करणायचे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बाेलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप नेहमीच सत्तेचा दुरुपयाेग करत आला आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना गैरसमजातून गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्र सरकारचा गुजरातमध्ये माेठा हस्तक्षेप आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मध्य प्रदेश पॅटर्न राबवून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे, असा आराेपही त्यांनी केला.
मध्य प्रदेश, कर्नाटकप्रमाणे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात चालू दिले जाणार नाही. बाहेर गेलेल्या काही आमदारांशी संपर्क झाला आहे. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना असून सरकार पाडण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही. राज्यातील सरकारला काेणताही धाेका नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
मुंबईवर विजय मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला जशासतसे उत्तर देऊ, असे सांगत अजून एकनाथ शिंदेशी संपर्क झालेला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या धर्तीवर तात्काळ मुख्यमंत्र्यांशी बैठक आयोजित केली असून शिंदेंशी संपर्क करणायचे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :