Latest

Heat Wave : यंदाचा ऑक्टोबर गेल्या दहा वर्षांत सर्वात उष्ण

Arun Patil

पुणे, पुढारी वृत्तसेवा : अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा ऑक्टोबर गत दहा वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरण्याच्या दिशेने जात आहे. यंदा मान्सून पंधरा दिवस आधीच परतल्याने उन्हाचा तडाखा लवकर जाणवला. त्यामुळे ऑक्टोबरमधील सरासरी तापमान 31.2 वरून 33.5 ते 34.7 अंशावर गेले आहे. दिवसभर अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि रात्री अस्वस्थ करणारा उकाडा असे चित्र यंदा दिसत आहे. तेज चक्रीवादळ संपताच तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागासह पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील हवामान तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार यंदाचा ऑक्टोबर हा गेल्या दहा वर्षांचे कमाल तापमानाचे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आजवर 2020 चा ऑक्टोबर हा गेल्या काही वर्षांतला सर्वात उष्ण ठरला होता. मात्र, यंदाचे वर्ष 2020 पेक्षाही उष्ण ठरत आहे. कारण दिवसाचे सरासरी कमाल तापमान हे 33.5 ते 34.7 वर गेले आहे. जे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत 1.5 ते 1.7 अंशांनी जास्त आहे. 11 ऑक्टोबर रोजी विदर्भातील बहुतांश शहरांचे तापमान 36 ते 37 अंशावर होते तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर, पुणे शहरातील कोरेगाव पार्क, चिंचवड या भागांचे तापमानाही 35 ते 36 अंशावर गेले आहे.

तेज चक्रीवादळामुळे वाढणार तापमान…

मुंबईत शनिवार, 21 रोजी हंगामातील सर्वोच्च तापमान 37.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले. गेल्या दशकात ऑक्टोबरमध्ये नोंदवलेले हे दिवसाचे तिसरे सर्वोच्च तापमान आहे. हवामान अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. हे वादळ हवेतील बाष्प शोषून घेत असल्याने हा परिणाम मुंबईपासून सुरू झाला असून तो राज्यावर लवकरच दिसणार आहे.

राज्यातील विक्रमी तापमानाचे रेकॉर्ड…

ऑक्टोबरमधील आजवरचे सर्वाधिक तापमान : 37.9 (12 ऑक्टोबर 1972)
गेल्या दहा वर्षांतील मुंबईचे सर्वाधिक तापमान : 37.5 (24 ऑक्टोबर 2014)
नागपूरचे चार वर्षांतील सर्वाधिक तापमान : 36.7 (19 ऑक्टोबर 2023)
ऑक्टोबर 2020 चे सरासरी तापमान : 32.3
ऑक्टोबर 2021 चे सरासरी तापमान : 31.9
ऑक्टोबर 2023 चे सरासरी तापमान : 33.7

कोरेगाव पार्कवर संशोधन सुरू…

राज्यातील विदर्भ हा भाग सर्वाधिक तापतो आहे. त्यापाठोपाठ कोकण असतो. मात्र, यंदा मध्य महाराष्ट्र पुढे आहे. त्यातही सोलापूर शहराचा पारा सतत 34 ते 36 अंशावर आहे तर पुणे शहरातील कोरेगाव पार्क, चिंचवड हे भाग राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. कोरेगाव पार्क भागावर पुणे हवामान विभाग स्वतंत्र संशोधन करीत आहे. त्यामुळे तेथे नुकतेच नवे स्वयंचलित हवामान केंद्र विकसित करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT