Latest

संजय राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीची वेबसाईट अचानक बंद ?

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपला महाराष्ट्रातील सरकार पाडायचे आहे आणि त्यासाठीच ईडीच्या धाडी टाकल्या जात आहेत. या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले.

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हा नील किरीट सोमय्यांचा पार्टनर असून बँक घोटाळ्याच्या पैशातून सोमय्या यांच्या चिरंजीवाने गृहप्रकल्प उभा केला, असा आरोप करतानाच फडणवीस सरकारच्या राजवटीत 25 हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. याच राजवटीत हरयाणाचा एक दूधवाला 7 हजार कोटींचा मालक बनला. त्यातले 3500 कोटी रुपये एकट्या महाराष्ट्रातून गेले असे सांगून संजय राऊत यांनी पत्राचाळीवरून सुरू असलेल्या आरोपांनाही आरोपांनीच प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक फ्रंटमॅन मोहित कंबोज याने पत्राचाळीची जमीन वाधवानकडून स्वस्तात खरेदी केली आणि त्यातही पीएमसी बँक घोटाळ्याचाच पैसा वापरला. हा घोटाळा आपण उघडकीस आणला असे एकीकडे सांगणारे भाजप नेते स्वत:च या घोटाळ्यात अडकलेले आहेत, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

नील किरीट सोमय्यांवर काय आरोप ?

किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नीलने पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानला ब्लॅकमेल केले. त्याच्याकडून 80 ते 100 कोटी रुपये कॅश घेतली आणि त्याची एक जमीन 7 कोटी रुपयांना आणि वसईतील 400 कोटी रुपयांची जमीन फक्‍त 4 कोटी रुपयांना घेतली. त्या जमिनीवर निकॉन फेज-1 आणि निकॉन फेज-2 हा हजारो कोटींचा गृहप्रकल्प उभारला.

या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे. पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचीही या कंपनीत भागीदारी आहे. त्याच्या या प्रकल्पाला पर्यावरणाचे परवाने मिळालेले नाहीत. या कंपनीला दिलेल्या अन्य सर्व परवानग्या रद्द करा. पीएमसी बँकेचा घोटाळ्यातून आलेल्या पैशातून नील सोमय्याने ठिकठिकाणी जमिनी घेतल्या. गुन्हे दाखल करून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करण्याची मागणीही राऊत यांनी केली.

वेबसाईट अचानक बंद केली ?

दरम्यान, कालच्या आरोपानंतर आज निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीची वेबसाईट बंद असल्याचे दिसून येते. या संदर्भातील ट्विट संजय राऊत यांनी रिट्विट केलं आहे. योगेश सावंत ट्विटर युझरने घोटाळ्याचे आरोप झालेल्या निल किरीट सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा या कंपनीची काल चालू असलेली वेबसाईट आज बंद आहे केली आहे असे ट्विट केलं आहे. हे करताना त्या युझर्सने कंपनी बंद असल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT