काठमांडू; पुढारी ऑनलाईन : नेपाळ काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी देशाच्या तिसऱ्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. पौडेल हे नेपाळ काँग्रेस आणि सीपीएन (माओवादी केंद्र) यासह आठ पक्षांच्या युतीचे उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीत 214 संसद सदस्य आणि 352 प्रांतीय असेंब्ली सदस्यांची मते मिळवली. पौडेल यांना १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारावाल लागला आहे. (Ram Chandra Poudel)
नेपाळ काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देउबा यांनी ट्विट करून पौडेल यांचे अभिनंदन केले. पौडेल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नेपाळ कम्युनिस्ट पार्टी यूएमएलच्या सुवास नेमबांग यांचा पराभव केला आणि देशाचे तिसरे राष्ट्रपती बनले. (Ram Chandra Poudel)
पौडेल हे सोमवारी नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. नेपाळमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 882 मतदार आहेत, ज्यात संसदेचे 332 सदस्य आणि सात प्रांतांच्या प्रांतीय असेंब्लीचे 550 सदस्य आहेत. निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शालिग्राम यांनी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ५१८ प्रांतीय असेंब्ली सदस्य आणि ३१३ संसद सदस्यांनी मतदान केले होते. 2008 मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर नेपाळमधील ही तिसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती.
काही राजकीय पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता, तर काही विविध कारणांमुळे गैरहजर होते. फेडरल खासदारांना 79 तर आमदारांना 48 मते आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे उमेदवार रामचंद्र पौडेल यांना 33,802 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सुवास नेमबांग यांना १५,५१८ मते मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 884 मतदारांपैकी 831 खासदार आणि आमदारांनी मतदान केले. (Ram Chandra Poudel)
पौडेल यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव
नेपाळच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले रामचंद्र पौडेल देशातील राजेशाही विरोधी आंदोलनात सक्रिय होते. देशात लोकशाही प्रस्थापित करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. 78 वर्षीय पौडेल आपल्या 62 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सुमारे 15 वर्षे तुरुंगात राहिले. शेवटच्या वेळी जेव्हा तत्कालीन राजा ज्ञानेंद्र यांनी 2003 मध्ये निवडून आलेल्या सरकारची हकालपट्टी करून सत्ता आपल्या हातात घेतली तेव्हा रामचंद्र पौडेल यांना विरोध केल्याबद्दल अटक करून सुमारे दीड वर्ष तुरुंगात टाकण्यात आले.
1991 मध्ये ते पहिल्यांदा तान्हू येथून खासदार म्हणून निवडून आले आणि त्याचवेळी त्यांना स्थानिक विकास मंत्रीही बनवण्यात आले. 1994 मध्ये ते दुसऱ्यांदा खासदार झाल्यावर त्यांची सभापतीपदी निवड झाली. 1999 मध्ये पौडेल यांनी उपपंतप्रधान म्हणून गृह मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.
सलग 6 वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर, नेपाळमधील संविधान सभेदरम्यान त्यांच्या पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून त्यांची निवड झाली. मात्र 17 वेळा संसदेत राहूनही पंतप्रधान निवडीसाठी झालेल्या मतदानात त्यांना यश मिळू शकले नाही. प्रत्येक वेळी बहुमताच्या आकड्यापेक्षा कमी मतदान झाले की, फेरमतदान घ्यायचे. अखेर 18 व्या निवडणुकीत कम्युनिस्ट नेते झलनाथ खनाल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
निवडणूक हरलो, पण हिंमत हारली नाही
राजकारणात संयम ठेवला तर एक दिवस यश नक्की मिळते असे म्हणतात आणि पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत 17 वेळा अपयशी ठरल्यानंतरही पौडेल यांनी हार मानली नाही. राजकारणात असे काही घडले की त्यांना देशातील सर्वोच्च घटनात्मक पद जिंकण्याची संधी मिळाली.
अधिक वाचा :