पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाबाबत महत्त्वाच्या नोंदी चांद्रयान-३ च्या रोव्हरने घेतल्या आहेत. या चाचण्यांत तेथे गंधक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे समोर आणले आहे. चंद्राच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून सहा दिवसांत रोव्हरने महत्वाची माहिती पाठवली. यातून तेथे खनिजे असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर अंतराळ शास्त्रज्ञ टीव्ही वेंकटेश्वरन यांनी चंद्रवरील शोधाविषयी महत्त्वाची माहीती दिली आहे. (Chandrayaan 3)
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या विक्रम लँडरमधील रोव्हरने आपले काम सुरू केले आहे. त्याच्या हातात सुर्यप्रकाशाचे अवघे ७ दिवस असल्याने त्याच्या कामाचा वेग वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी रोव्हरने तापमानाबाबत नोंदी पाठवत चंद्राच्या पृष्ठभागावर उणे १० अंश ते ६० अंश तापमान असल्याची महत्वाची माहिती पाठवली होती. चंद्रावर ॲल्युमिनीयम, टायटानियम, सिलिकॉन, मँगेनिज आणि ऑक्सिजन असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठाभागावर सल्फर असल्याची पुष्टी केल्यानंतर टीव्ही वेंकटेश्वरन म्हणाले की, "आता रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर काही घटक शोधले आहेत. रोव्हर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चंद्राच्या मूलभूत रचनेचा शोध घेईल. चांद्रयान १, चांद्रयान २ आणि अमेरिकन ऑर्बिटरने याआधी रिमोट सेन्सिंग केले आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजांचे मॅप तयार केले आहेत. परंतु हे एक रिमोट सेन्सिंग आहे जे सुमारे १०० किमी अंतरावरून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला चंद्रावर किमान काही ठिकाणी प्रत्यक्ष उतरण्याची गरज आहे. हा डेटा गोळा केल्यानंतर तो रिमोट सेन्सिंग डेटाशी जुळतो का ते पाहावे लागेल. जर तो जुळला तर रिमोट सेन्सिंग डेटावर आमचा विश्वास खूप जास्त असेल," असे वेंकटेश्वरन यांनी म्हटले आहे. (Chandrayaan 3)
हेही वाचा :