जितेंद्र आव्हाड  
Latest

मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान : जितेंद्र आव्हाड 

अमृता चौगुले

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केल्याचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी करीत, असे कटकारस्थान सर्वोच्च अशा शक्तीमान माणसाच्या नेतृत्वाखाली रचले जात आहेत. खोटे गुन्हे टाकले जातात. जे भाई लोक मोठ्या भाईलोकांशी दुबईमध्ये इथे-तिथे बोलतात; त्यांच्या केसेस दाबल्या जातात. उलट आम्हालाच प्रश्न विचारले जाते, असे ही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. त्यामुळे तो सर्वोच्च शक्तिमान माणूस कोण? या चर्चेला उधाण आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या अनंत करमुसे खटल्यात ठाणे पोलिसांनी आपणावर चक्क २४ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करणारे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच राबोडी दंगल आटोक्यात आणल्याच्या नोंदी असतानाही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात चक्क 'समाजात तेढ निर्माण करण्याचे काम आव्हाड करीत आहेत', असेही नमूद केल्याने आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

पोलिसांनी खोटे प्रमाणपत्र सादर करुन राज्याची प्रतिमा खराब होणार आहे, याची कल्पना ठाणे पोलिसांना नाही का? आंदोलनातील गुन्हे असणारी माणसेच राजकारणात असतातच; असे गुन्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहेत. मग, त्यांनाही अट्टल गुन्हेगार म्हणणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

समाजमाध्यमांवर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांवर अश्लील पोस्ट करणार्‍या अनंत करमुसे याला मारहाण झाल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यनंतर करमुसे यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावत ज्या न्यायालयात ह्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्याच न्यायालयात तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत.

तत्पूर्वी  उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले होते. पावणेदोन वर्षानंतर त्याची याचिका फेटाळताना, "हा माणूस खोटारडा असून स्वच्छ हाताने आणि स्वच्छ हेतून न्यायालयात आलेला नाही", असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदविले होते. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालय गाठले. त्यावेळी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत आव्हाड यांनी  महाराष्ट्रातील सर्वशक्तीमान व्यक्ती करमुसे याच्या मागे उभी असून त्याला मदत व्हावी म्हणून राज्य सरकार म्हणजेच वर्तकनगर पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

सरकार बदलल्यानंतर प्रतिज्ञापत्र बदलतं, असे कधी होत नाही. पण, असे यावेळी घडले. या प्रतिज्ञापत्रात सर्वात धक्कादायक प्रकार असा होता की, आपणाला चक्क गँगस्टर असल्याचे न्यायालयासमोर भासविण्यात आले. वास्तविक पाहता, करमुसे प्रकरण वगळता आपणांवर एकही शारीरिक इजेचा गुन्हा नाही. सर्व २३ गुन्हे आंदोलनातील असून पैकी २० गुन्हे निकाली निघाले आहेत.

प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी अत्यंत हास्यास्पद बाब नमूद केली की, "जितेंद्र आव्हाड हे विविध मोठ्या माणसांविरुद्ध सोशल मीडिया, ट्वीटरद्वारे टीका करतात. प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. ते अशी कमेंट करीत असतात की, ज्यामुळे दोन समाजात वाद निर्माण होईल. " जर, मी अशी टीका केली आहे. तर, माझ्यावर तशी केस का घातली नाही? अजूनही आपले आव्हान आहे की अशी केस करावी. जर, आपण दोन समाजात वाद निर्माण केला असेल तर आपणावर गुन्हा दाखल करुन अटक का केली नाही? पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव जेव्हा प्रतिज्ञापत्र सादर करतात; तेव्हा आपण खोटे लिहित आहोत, याची त्यांना कल्पना नाही? अमरसिंह जाधव यांचे हे प्रतिज्ञापत्र पोलीस आयुक्तांना विचारल्याशिवाय सादर झालेले नसणार! असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT