पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुलगी त्रास देते म्हणून सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीला चटके दिले. त्यानंतर कठीण वस्तू डोक्यात मारुन खून केला. खून केल्यानंतर मुलीला फिट आल्याचा बहाणा करत तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत मारहाण झाल्याचे लक्षात आल्यावर सावत्र आईस उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.
श्वेता राजेश आनंद (5, रा.उत्तमनगर, शिवणे) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या 36 वर्षीय आईवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्रतिका राजेश आनंद असे तिचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (दि.23) सकाळी 9 ते दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलिस हवालदार घोलप यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, श्वेताचे वडिल एका खासगी कंपनीत लेबर म्हणून काम करतात. श्वेताच्या आईचा मृत्यू झाल्यावर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांच्या दुसर्या पत्नीस पहिल्या पतीपासून दोन मुले असून ते मिरज येथे शिक्षण घेतात. श्वेताच्या आईचा मृत्यू झाल्यापासून ती इतर कोणाकडे रहात नव्हती. आईची आठवण येत असल्याने ती सावत्र आईकडे नीट राहत नव्हती. श्वेता सातत्याने त्रास देत असल्याने तिची सावत्र आई तिला मारहाण करत होती. मात्र, मारहाण करुनही श्वेताचा त्रास बंद होत नसल्याने मागील दोन तीन दिवसांपासून तिने श्वेताला चटके देण्यास सुरुवात केली.
या नंतर गुरूवारी (दि.23) सकाळी तिने श्वेताच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन तिचा खून केला. श्वेता निपचित पडल्यावर पतीला काय सांगायचे, हा प्रश्न सावत्र आईपुढे उभा राहिला. यानंतर तिने श्वेताला जवळच्या डॉक्टरकडे नेत तिला फिट आल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीत ती मृत झाल्याचे लक्षात आले. तसेच तिच्या अंगावर चटके दिल्याचे डाग होते. हा प्रकार संशयास्पद असल्यामुळे रुग्णालयातून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर सावत्र आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तीने मुलगी सतत त्रास देत असल्याने तिला मारहाण करत खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर करत आहेत.