Who Is Latif Bhat: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याला ठार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील X पोस्ट करत सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे. काश्मीरमधील 'लष्कर'चा शेवटचा दहशतवादी लतीफ भटचा खात्मा, असे अमित शहांनी म्हटले आहे. हा लतीफ भट कोण होता, अमित शहांची पोस्ट नेमकी काय हे सविस्तर जाणून घेऊया.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी X वरील पोस्टमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये पहाटे झालेल्या कारवाईत लष्कर-ए- तोयबाचा काश्मीर खोऱ्यातील शेवटचा दहशतवादी लतीफ भट याला ठार करण्यात आले. त्याचा साथीदार उमर निसार यालाही मंगळवारी कुलगाममध्ये झालेल्या कारवाईत ठार करण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेत सुरक्षा यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय होता, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. देश या शूर जवानांच्या धैर्याला सलाम करतो, अशा शब्दांत त्यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले.
मोहम्मद लतीफ भट हा दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खेरवान परिसरातील रहिवासी होता. तो लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. त्याचे नाव द रेजिस्टन्स फ्रंट (TRF) या संघटनेशीही जोडले गेले होते. ही संघटना लष्कर-ए-तोयबाची सहयोगी संघटना मानली जाते.
लतीफ भट पहिल्यांदा शोपियां येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईदरम्यान चर्चेत आला होता. या मोहिमेत तो लष्करचा दहशतवादी जाकिर गनई याच्यासोबत होता. तब्बल पाच दिवस ही कारवाई सुरू होती. अखेर सुरक्षा दलांनी जाकिर गनई याला ठार केले. मात्र, लतीफ भट घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्याच्या शोधात होत्या.
22 जुलै 2026 रोजी अनंतनागमधील लाल चौक परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशिक हुसैन कुरैशी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान लतीफ भट याचे नाव समोर आले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली होती.
31 जुलै रोजी कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासातही लतीफ भट याचे नाव समोर आले होते.
यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी 6 ऑगस्ट रोजी लतीफ भटचे फोटो असलेली पोस्टर्स अनेक महत्त्वाच्या ठिकाणी लावली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 15 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेला आणि सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान ठरलेला लतीफ भट अखेर कुलगाममधील कारवाईत ठार झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.