Kulgam Encounter Lateef Bhat Killed : जम्मू-काश्मीरमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश; 'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर लतीफ भटचा खात्‍मा

कुलगाम हल्ल्यात सहभाग, चकमकीवेळी मशिदीत लपला; अधिकाऱ्यांनी दिली होती शरणागती पत्करण्याची संधी
Kulgam Encounter Lateef Bhat Killed
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट चकमकीत ठार झाला आहे.
Published on: 
Updated on: 

Kulgam Encounter Lateef Bhat Killed : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज (दि. १८ नोव्‍हेंबर) सकाळी सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर लतीफ भट ठार झाला आहे. मशिदीत लपलेल्‍या भटला सुरक्षा दलांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्याला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले होते.

भटने शरणागती पत्‍करण्‍यास दिला नकार

चकमकीचा समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक अधिकारी भटला "आम्ही तुझ्यासोबत आहोत," असे म्हणताना ऐकू येतो. मात्र, भटने शरणागती पत्करण्यास नकार देत "मला अल्लाहकडे जायचे आहे. मी खूप आनंदी आहे," असे म्‍हणताना दिसत आहे. पहाटेच्या सुमारास पुन्हा गोळीबार सुरू झाला, कारण सुरक्षा दलांनी कुलगाममधील अनेक गावांमध्ये आपली मोहीम अधिक तीव्र केली होती. भटचा साथीदार, उमर निसार दार, सोमवारी कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत मारला गेला होता. निसार आणि लतीफ हे दोघेही ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) चौकीवर झालेल्या हल्ल्यात सामील होते.

सीसीटीव्हीमध्ये दशतवादी झाले होते कैद

मंगळवारी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले होत. यामध्‍ये दहशतवादी दार आणि भट ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफ चौकीवर हल्ला करण्यापूर्वी परिसराची पाहणी (रेकी) करताना दिसत आहेत. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. तेव्हापासून या भागात मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोधमोहीम राबवण्यात येत असून, ५०० हून अधिक व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दहशतवाद्यांनी कोणत्या भागांची पाहणी केली होती?

पोलिसांच्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबरच्या हल्ल्याच्या तपासातून असे समोर आले आहे की, स्थानिक रहिवासी असलेल्या दारने लतीफ भटसोबत मिळून हल्ल्याच्या तयारीसाठी अनेक ठिकाणांची पाहणी केली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "१० नोव्हेंबर रोजी उमर निसार दारने लष्कर कमांडर लतीफ भटसोबत मिळून मीर बाजार, अखरान, हबलिश आणि किलामासह अनेक ठिकाणांची पाहणी केली होती." त्यांचा उद्देश संभाव्य लक्ष्ये शोधणे आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यांचे नियोजन करणे हा होता.

दार आणि भटने केला होता अखरान सीआरपीएफ चौकीवर हल्ला

११ नोव्हेंबर रोजी दार आणि भट यांनी अखरान येथील सीआरपीएफ चौकीवर हल्ला केला आणि त्यानंतर तेथून पळून गेले. पोलिसांनी नंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि विश्लेषण करून या दोघांची ओळख पटवली होती. या फुटेजमध्ये १० नोव्हेंबर रोजी केलेली रेकी (टेहळणी) आणि त्यानंतर अखरान येथील सीआरपीएफ (CRPF) चौकीवर हल्ला करून पळून जातानाचे त्यांचे कृत्य कैद झाले आहे. दार बेपत्ता झाल्यानंतर, त्याच्या कुटुंबीयांनी कुलगाममधील पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

दारने सहा महिन्‍यांपासून दिला होता भटला आश्रय

तपासातून असे समोर आले आहे की, निसार दार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून लतीफ भटला आश्रय आणि मदत पुरवत होता. स्थानिक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला लतीफ भट, २२ जुलै रोजी अनंतनागमध्ये पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सामील होता; या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाले होते, असेही स्‍थानिक पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.