Ramayana Movie Controversy: ‘रामायण’ चित्रपट अडचणीत! रावण आणि राम-लक्ष्मणांच्या चित्रणावरून हिंदू संघटनांचा संताप; बहिष्काराची मागणी

Ramayana Movie Controversy: ‘रामायण’ चित्रपटातील श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्या चित्रणावर मुंबईतील काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
Ramayana Movie Controversy
Ramayana Movie ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

Ramayana Movie Controversy: बॉलिवूडमध्ये सध्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. भगवान श्रीरामांची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच, काही हिंदू संघटनांनी चित्रपटातील कथानक आणि पात्रांच्या चित्रणावर आक्षेप घेतला आहे. मुंबईतील काही हिंदू संघटनांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील मूळ कथेत बदल केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहन करत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

रावणाच्या भूमिकेवर सर्वाधिक आक्षेप; नेमका वाद काय?

17 नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी चित्रपटातील काही दृश्यांवर नाराजी व्यक्त केली. चित्रपटात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांचे चित्रण वाल्मिकी रामायणातील वर्णनापेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला. त्यांच्या मते, चित्रपटाच्या नावाखाली सर्जनशील स्वातंत्र्याचा आधार घेत रामायणाच्या मूळ कथेत बदल केले जात आहेत. त्यामुळे हिंदूंनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या संपूर्ण वादात रावणाच्या पात्रावर सर्वाधिक आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटात रावणाला शोषितांचा रक्षक आणि गरिबांना सोन्याची घरे देणारा राजा म्हणून दाखवण्यात आल्याचा संघटनांचा आरोप आहे. रामायणातील रावणाच्या पारंपरिक चित्रणापेक्षा हे सादरीकरण वेगळे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शूर्पणखेच्या पतीपासून ते सीतेच्या युद्धापर्यंत, अनेक दृश्यांवर आक्षेप

चित्रपटातील वाद केवळ रावणाच्या भूमिकेपुरता मर्यादित नाही. काही विशिष्ट दृश्यांवरही हिंदू संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांच्या आरोपानुसार, चित्रपटात रावणाने शूर्पणखेचा पती विद्युतजीव याची हत्या केल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच भगवान श्रीराम आणि लक्ष्मण रावणाच्या सैन्यापासून पळताना दिसत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. याशिवाय माता सीता राक्षसांशी युद्ध करत असल्याचे दृश्य दाखवल्याबद्दलही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रसंगांचे चित्रण वाल्मिकी रामायणातील कथेशी जुळत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. धार्मिक ग्रंथांवर आधारित चित्रपट तयार करताना त्यातील मूळ कथा आणि पात्रांचे महत्त्व जपले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

सेन्सॉर बोर्डावरही संघटनांचा निशाणा

चित्रपटाच्या विरोधासोबतच हिंदू संघटनांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुनील घनवट यांनी आरोप केला की, इतर धर्मांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी सेन्सॉर बोर्ड अधिक काळजी घेतं. मात्र, हिंदूंच्या धार्मिक विषयांशी संबंधित चित्रपटांच्या बाबतीत तितकी संवेदनशीलता दाखवली जात नाही.

धार्मिक ग्रंथांवर आधारित चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी संबंधित धर्मग्रंथांचा अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही विरोध करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

Ramayana Movie Controversy
Javed Akhtar: 'हिंदुस्तानातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम...', जावेद अख्तरांच्या विधानाने पेटला वाद; मौलाना संतापले, दिलं प्रत्युत्तर

सनातन संस्थेनेही व्यक्त केली नाराजी

या वादात आता सनातन संस्थेनेही भूमिका मांडली आहे. संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी चित्रपटातील बदलांवर नाराजी व्यक्त केली.

रामायणावर चित्रपट तयार करताना मूळ ग्रंथात वर्णन केलेल्या घटनांचा आधार घेतला पाहिजे. मात्र, चित्रपटात अनेक प्रसंग वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. अशा प्रकारचे बदल स्वीकारता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ramayana Movie Controversy
Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला; 12 चित्रपटांचा विक्रम मोडला, आतापर्यंत किती कोटी कमावले?

चित्रपटाच्या निर्मात्यांची अद्याप प्रतिक्रिया नाही

दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटावरून धार्मिक आणि सांस्कृतिक वाद चर्चेत आहे. एका बाजूला हिंदू संघटना चित्रपटातील बदलांना विरोध करत आहेत, तर दुसरीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता चित्रपटाचे निर्माते या आरोपांवर काय स्पष्टीकरण देतात याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.