राष्ट्रीय

West Bengal Election 2026 |पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही बंपर मतदान, सुमारे ९० टक्‍के नोंदणी

काही भागांत किरकोळ चकमकी आणि तणावाच्या घटना, हुगळीत सर्वाधिक उत्साह

पुढारी वृत्तसेवा

West Bengal Election 2026

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ८९.९९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. पूर्व बर्धमान जिल्ह्यात सुरुवातीच्या १० तासांत सर्वाधिक ९२.४६ टक्के, तर कोलकाता दक्षिण जिल्ह्यात सर्वात कमी ८६.११ टक्के मतदान झाले. दरम्यान, काही भागांत किरकोळ चकमकी आणि तणावाच्या घटना समोर आल्या आहेत, मात्र इतर सर्व मतदारसंघांत मतदान शांततेत पार पडले.

हुगळीत सर्वाधिक उत्साह

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, विविध जिल्ह्यांतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :हुगळी: ९०.३४%, हावडा: ८९.४४%, नदिया: ९०.२८%,उत्तर २४ परगणा: ८९.७४%,दक्षिण २४ परगणा: ८९.५७%,कोलकाता उत्तर: ८७.७७%मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ८५.५१ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात त्यांच्याविरोधात भाजपचे सुवेंदु अधिकारी मैदानात आहेत. बुधवारी कालीघाट परिसरात सुवेंदु अधिकारी यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला, जिथे 'जय बंगला'च्या घोषणा देण्यात आल्या.

दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान

या टप्प्यात एकूण १४२ विधानसभा जागांसाठी १,४४८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी ४१,००१ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे, ८,८४५ केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली. या टप्प्यात ३.२२ कोटींहून अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, ज्यात १.६४ कोटी पुरुष आणि १.५७ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.

केंद्रीय दलांचा कडक बंदोबस्त

निवडणूक भयमुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २,४०७ कंपन्या तैनात केल्या होत्या. संवेदनशील भागांत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

TMC की BJP? कोणाची सरशी होणार?

राज्यात मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच असून, काँग्रेस आणि डावे पक्षही आपली ताकद पणाला लावत आहेत. भवानीपूर ही या निवडणुकीतील सर्वात हाय-प्रोफाइल जागा ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT