

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदम येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) जोरदार निशाणा साधला. राज्यातील निवडणुकीचे वारे पूर्णपणे बदलले असून, पहिल्या टप्प्यातील मतदानाने भाजपच्या विजयाचा पाया रचल्याचा दावा त्यांनी केला. बंगालच्या भूमीत दीर्घकाळापासून परिवर्तनाची जी लाट दिसत होती, त्यावर काल झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने शिक्कामोर्तब केले आहे. भाजपच्या बाजूने उमटलेला हा जनमताचा कल पक्षाच्या विजयाचा शंखनाद करणारा असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी (दि. २४) पहिल्या टप्प्यात १५२ जागांवर मतदान पार पडले. या काळात मतदारांनी विक्रमी उत्साहाने सहभाग घेत तब्बल ९२ टक्के मतदान केले. या प्रचंड जनसहभागामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला असून, पक्षाने बंगालमध्ये विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी टीएमसीवर जोरदार हल्लाबोल केला. ज्या बंगालमध्ये टीएमसीने लोकशाहीच्या मंदिराला पायदळी तुडवले होते आणि आपल्या हुकूमशाहीच्या जोरावर लोकशाहीचे नुकसान केले होते, तिथे आता पहिल्या टप्प्यात जनतेने लोकशाहीच्या मंदिराचे पुनर्निर्माण केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात या लोकशाहीच्या मंदिरावर विजयाचा ध्वज फडकवण्याचे आवाहन मोदींनी जनतेला केले.
टीएमसीवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, ही पार्टी आता हताश आणि सैरभैर झाली आहे. काल रात्रभर टीएमसी आपल्या गुंडांना मैदानात उतरवून शक्तीप्रदर्शन करत होती. मात्र, बंगाल हे क्रांतीची आणि वीरांची भूमी आहे, हे कोणालाही विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे विझणारा दिवा शेवटी फडफडतो, तशीच टीएमसीची अवस्था सध्या झाली आहे, असे मोदींनी उपरोधिकपणे म्हटले. ४ मे रोजी निकाल लागल्यानंतर टीएमसीच्या गुंडांना लपायला जागा उरणार नाही आणि त्यांना वाचवणारे कोणीही नसेल, असा इशारा त्यांनी दिला. टीएमसीच्या महाजंगलराजचा अंत आता निश्चित झाला असून, जनतेने त्याचा उद्घोष केला आहे.
बंगालचे हरवलेले वैभव पुन्हा परत आणण्यासाठी आणि या भूमीला पुन्हा एकदा संधींचे केंद्र बनवण्यासाठी 'स्वातंत्र्य' मिळवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. टीएमसीच्या काळात फोफावलेले भय, भ्रष्टाचार, सिंडिकेट, महिलांवरील अत्याचार, घुसखोरी, बेरोजगारी आणि बेकारी यांपासून सुटका मिळवणे ही काळाची गरज आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' या ऐतिहासिक आवाहनाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, आता बंगालमध्ये नव्या क्रांतीची वेळ आली आहे आणि ही क्रांती तुमच्या एका मताने शक्य होईल. बंगालची नारीशक्ती २१ व्या शतकातील नवी गाथा लिहित आहे आणि आता या सरकारला बदलल्याशिवाय महिला थांबणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस आश्वासन दिले. भाजपचे सरकार आल्यास महिलांचे स्वप्न कोणीही धुळीस मिळवू शकणार नाही आणि ४ मे रोजी सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक अन्यायाची फाईल उघडली जाईल, ही 'मोदींची गॅरंटी' असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. याशिवाय, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी दीड लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल आणि हे घर महिलांच्याच नावे असेल. भाजप बंगालच्या प्रत्येक भगिनीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. भाजप सरकार आल्यास महिलांना सुरक्षा, सन्मान आणि समृद्धी मिळेल आणि सिंडिकेटचे वर्चस्व संपुष्टात येईल.
मध्यमवर्गीयांच्या हिताचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भाजप सरकारने मध्यमवर्गीयांचे जीवन सुलभ करण्यासाठी गेल्या ११ वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. २०१४ पूर्वी केंद्रात टीएमसीच्या पाठिंब्यावर चालणारे सरकार होते, तेव्हा वार्षिक दोन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर लावला जात असे. मात्र, आम्ही मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला असून, आज १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य कर आकारला जातो. भाजप सरकार बंगालमध्ये सत्तेत आल्यास मध्यमवर्गीयांचे हित सर्वोपरि असेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.