

नवी दिल्ली : तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. याबरोबर मराष्ट्रातील बारामती, राहुरीसह गुजरातमधील उमरेठ मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. या सर्व निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत तामिळनाडूच्या २३४ जागांवर ८४.४१ टक्के तर पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर ९१. ४६टक्के मतदान झाले.
यावर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये नोंदवली गेली. भारतीय निवडणूक आयोग पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या प्रत्येक मतदाराला सलाम करतो.
तमिळनाडूमध्ये २३४ जागांवर एकूण ४०२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळेस राज्यात भरघोस मतदान झाले. यापूर्वी २०२१ मध्ये ७२.७३ टक्के, २०१६ मध्ये ७४.२४ टक्के आणि २०११ मध्ये ७८.२९ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळेस तमिळनाडूमध्ये सर्व विक्रम मोडत मतदान झाले.
मतदानाच्या टक्केवारीत असामान्य वाढ झाल्याच्या वृत्तांचे द्रमुकने खंडन केले. मतदार यादीतून मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्यानंतर, मतदारांच्या स्थितीचे हे कल यथार्थ प्रतिबिंब असल्याचे पक्षाने म्हटले.
पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील १५२ जागांवर एकूण १४७८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बंगालमध्ये मतदार यादीच्या एसआयआरचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने प्रचंड विरोध केला. या प्रक्रियेनंतर देखील राज्यात विक्रमी मतदान झाल्याने याचा फायदा कोणाला होणार याचे तर्क- वितर्क लावले जात आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. कुमारगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाला. एका व्हिडिओमध्ये सुवेंदू सरकार आपल्या सुरक्षा रक्षकासह हल्ल्यातून वाचण्यासाठी पळताना दिसत आहेत. असे असूनही, जमाव त्यांना मारहाण करतच राहिला. बर्नपूरच्या रहमतनगर परिसरात आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवरही हल्ला झाला. गाडीची मागची काच फोडण्यात आली. अग्निमित्रा यांनी सांगितले की, मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. बंगालमधील इतर अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसले. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचेही तक्रारी करण्यात आल्या.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला. जनतेने एसआयआरच्या विरोधात प्रचंड मतदान केले असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले. तर तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा आणि गुंडगिरीचा अस्त झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५६.७२ टक्के, राहुरीमध्ये ५४.९६ टक्के मतदान झाले. तर गुजरातच्या उमरेठमध्ये ५८.५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १४२ मतदारसंघामध्ये २९ एप्रिल रोजी मतदान होईल. यासाठी १४६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.