तृणमूलच्‍या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्‍या माजी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी.  Pudhari
राष्ट्रीय

Mamata Banerjee | ममता बॅनर्जींना मोठा धक्‍का! निकटवर्तीय खासदार सोडणार साथ? भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण तापलं!

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलच्‍या भ्रष्‍टाचारावर भाष्‍य

पुढारी वृत्तसेवा

Mamata Banerjee Close Aide TMC MP Likely to Join BJP

कोलकाता : तृणमूल काँग्रेसला (TMC) आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या खासदार काकोली घोष दस्तीदार खासदारकीचा राजीनामा देण्‍याची शक्‍यता आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत त्यांनी अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्‍यात आलेली नाही. मात्र, रविवारी (दि.२५ मे) काकोली घोष यांनी पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे.

काकोली घोष खासदारकी सोडण्याच्‍या तयारी?

'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, काकोली घोष यांचे पुत्र वैद्यनाथ घोष दस्तीदार यांनी सांगितले की, काकोली यांनी तृणमूल काँग्रेसच्‍या महिला मोर्चा पदाचाही राजीनामा दिला आहे. माध्‍यमांशी बोलताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील घोटाळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचला आहे.

काकोली घोष यांनी राजीनामा का दिला?

राजीनाम्याचे कारण सांगताना वैद्यनाथ घोष दस्तीदार म्हणाले की, "बारासात लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा जागांपैकी सहा जागांवर टीएमसीचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आणि गेल्या ५ ते १० वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत माझ्या आईने हे पाऊल उचलले आहे."

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून तृणमूलवर निशाणा

वैद्यनाथ घोष यांनी सांगितले की, आजही कोकोली या ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती आहेत; पण एखादी व्यक्ती या गोष्टी कधीपर्यंत सहन करणार? पार्थ चॅटर्जी यांच्या काळात नोकऱ्या विकल्या गेल्या.यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले. ज्योतिप्रिय मल्लिक यांना रेशन घोटाळ्यात अटक झाली. आम्ही सर्वांनी आर. जी. कर रुग्णालयातील घटनाही पाहिली आहे. याचा फटका आम्हालाही सहन करावा लागला. आम्ही एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आलो आहोत. इतक्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकार कोणी किती काळ सहन करायचे? लोक आमच्यावरही बोटे उचलतात. केवळ वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंधांमुळे माझी आई आतापर्यंत गप्प होती."

भाजपमध्ये प्रवेश करणार का?

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांवर बोलताना घोष म्हणाले, "हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्न नाही. माझी आई फक्त एवढीच भूमिका घेत आहे की, त्या भ्रष्टाचाराचा भाग बनू शकत नाहीत. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे गरजेचे होते." विशेष बाब म्हणजे, केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतीच काकोली घोष दस्तीदार यांना 'वाय' (Y) श्रेणीची सुरक्षा मंजूर केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी पदावरून हटवले होते

बारासात मतदारसंघातील चार वेळच्या खासदार असलेल्या काकोली घोष दस्तीदार या तृणमूलच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानल्या जातात. निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभेत पक्षाच्या 'मुख्य प्रतोद' पदावरून त्यांना हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला आहे.

राजीनाम्‍याचे कारण केवळ निवडणुकीतील पराभव नव्‍हे

काकोली यांनी तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात, बारासात आणि उत्तर २४ परगणा परिसरातील निडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्‍वीकारल्‍याचा औपचारिक उल्लेख केला आहे. मात्र, या राजीनाम्याचा राजकीय संदेश केवळ स्थानिक संघटनात्मक जबाबदारीपुरता मर्यादित नसून, तो अत्यंत व्यापक असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT