religious schools close in pakistan occupied kashmir
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये भारताकडून होणाऱ्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे भारताच्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने एक हजारहून अधिक मदरशांना पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये जवळपास १९ लोक मृत्यूमुखी पडले. तर अनेक लोक जखमी झाले. या घटनेची भारताने गंभीर दखल घेतली. या घटनेतील दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना पकडून लवकरच त्यांना शिक्षा देणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले. यानंतर भारताकडून होणाऱ्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्ताननेही बचावासाठी आणि प्रतिकारासाठी जोरार तयारी चालवली आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
भारत आणि पाकिस्तान या परंपरागत शत्रुंमध्ये काश्मीरवरून युद्धे झाली आहेत. गेल्या अनेक दशकांमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानने अनेक दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले आहे. पाकिस्तानला पृथ्वीवरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीर खोरे हे नेहमी अशांत ठेवायचे आहे. अशावेळी जेंव्हा दोन्ही देशांमधील तणावात जेंव्हा वाढ होते, तेंव्हा सीमेवर राहणाऱ्या लोकांना अधिक सतर्क रहावे लागले. रॉयटर्स एजन्सीच्या अहवालानुसार पाकिस्तानने म्हटले आहे की, त्यांच्याकडे विश्वसनीय गुप्त माहिती आहे की, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत लवकरच पाकिस्तानवर मोठी सैन्य कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. दोन्ही देशांनी सध्याच्या परिस्थितीतला तणाव दूर करण्यासाठी आणि दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले. रूबियो यांनी पहलगामसारख्या अमानवीय घटनेच्या तपासासाठी पाकिस्तानने सहकार्य करण्याची विनंती केली. दरम्यान पीओकेच्या धार्मिक प्रकरणाच्या विभागाचे प्रमुख हाफिज नजीर यांनी सर्व मदरशांना १० दिवसांची सुट्टीची घोषणा केली आहे.
भारताच्या सैन्य तयारीने घाबरलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागातील नियंत्रण रेषेवर शुक्रवारी रात्रीही गोळीबार केला. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचे मुख्य शहर मुजफ्फराबादमध्ये आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. जर भारताने हल्ला केला, तर अशा स्थितीत कोणती काळजी घ्यायची. काय करायचे. तसेच मुलांना मलमपट्टी करणे, स्ट्रेचरवरून कसे न्यायचे. आग कशी विझवायची यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्लेखोरांचे पोस्टर जाहीर केले आहेत. ज्यामध्ये दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक दहशतवाद्याचा सहभाग आहे. हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहेत. या तिघांविषयी माहिती देणाऱ्यांना २० लाख रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सुरक्षादलांचे म्हणणे आहे की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपून बसले आहेत. त्यांच्या तपासासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन चालवले जात आहे.
भारताकडून पहलगाम हल्यांची गंभीर दखल घेण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांशी बैठका घेतल्या आहेत. तसेच कॅबीनेटचीही बैठक घेतली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांच्या आकांवर कारवाई करण्यासाठी आणि दहशतवाद आणि दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पीएम मोदी यांनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्या दिले आहे. त्यामुळे भारताकडून चाललेल्या या तयारीने पाकिस्तान पुरता गांगरून गेला असून, पाकिस्ताननेही युद्धाची तयारी सुरू केली आहे. तर चीनकडूनही रणगाडे मागवल्याची माहिती समोर येत आहे. काही जरी केले तरी भारताच्या सैन्य ताकदीपुढे पाकिस्तान टीकू शकत नाही हे त्याला देखील माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ माजला आहे.