नवी दिल्ली: नाशिकमधील तपोवनातील १७०० झाडे साधुग्रामसाठी तोडण्यात येऊ नयेत तसेच राज्यभरात बिबट्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यावरही उपाययोजना करण्यात यावी, या दोन मागण्यांसाठी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. दोन्ही विषयांच्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन सकारात्मक कारवाई करणार असल्याचे आश्वासन मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
याबाबत बोलताना खासदार भास्कर भगरे म्हणाले की, तपोवनातील झाडे ही नाशिककरांची अस्मिता आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूसंतांची सोय नक्कीच केली पाहिजे मात्र त्यासाठी झाडे तोडू नयेत. अवतीभवती मोठ्या प्रमाणात जागा आहे तिथे सोय करावी, ही समस्त नाशिककरांची मागणी आहे. ही मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली.
कुंभमेळा नाशिकमध्ये पहिल्यांदाच होत नाही, यापूर्वी अनेक वेळा झाला आहे मात्र तेव्हा कधी झाडे तोडण्यात आली नाहीत. मग यंदाच झाडे तोडण्याचा घाट का घातला जात आहे, यामागे काही ना काही उद्देश नक्कीच आहे. याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी, ही मागणी केली. सोबतच माझ्या मतदारसंघासह नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिबट्याचा प्रश्न मोठा आहे. बिबटे जंगलाकडून गावाकडे, शेताकडे येत आहेत.
त्यांना शिकार मिळत नसल्यामुळे ते माणसांवर हल्ले करत आहेत, अनेक प्राणी मारले जात आहे. स्वतः शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीवर जायला घाबरतात. कामाला मजूर मिळत नाहीत ही गोष्ट देखील मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे बिबट्यांची नसबंदी केली पाहिजे, प्रजनन रोखले पाहिजे आणि जे हिंस्र बिबटे आहेत त्यांना निवारा केंद्रात टाकले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना बिबट्या संदर्भात माहिती दिली पाहिजे, अशीही मागणी खासदार भगरे यांनी केली.
मंत्री नितेश राणे वृक्षतोडीबद्दल जे बोलत आहे ते चुकीचे आहे. मूळ मुद्द्याला छेद देण्याचा आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वृक्षतोडी विरोधात सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र आले आहेत . वृक्षतोडीचे किती वाईट परिणाम आहेत हे आपण बघितले आहेत. नितेश राणे राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी असे वक्तव्य करू नये, असेही ते म्हणाले.