तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय . Pudhari
राष्ट्रीय

Tamil Nadu CM Vijay | "प्रत्येक गोष्टीत 'ब्लॅक अँड व्हाईट' ... : कपड्यांवरुन होणार्‍या टीकेवर CM विजय नेमकं काय म्‍हणाले?

आता तामिळनाडूत टीव्हीके आणि द्रमुक यांच्यातच मुख्य लढत

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu CM Vijay

चेन्‍नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मोठ्या जाहीर सभेत त्यांच्या कपड्यांवर होणाऱ्या टीकेला चोख उत्तर दिले. यासोबतच त्यांनी द्रमुकच्या (DMK) राजकीय संस्कृतीवर कडाडून टीका करत, 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) हाच राज्याचा मुख्य राजकीय पक्ष असल्याचेही त्‍यांनी ठासून सांगितले.

आम्ही सूट का घालू शकत नाही?

तिरुचिरापल्ली येथे आयोजित 'आभार सभेत' बोलताना विजय म्‍हणाले, माझा सूट घालण्याचा निर्णय हा राजकीय चर्चेचा विषय का बनला आहे? सध्या अनेक लोक आम्ही सूट घालण्याबद्दल बोलत आहेत. आम्ही सूट का घालू शकत नाही? सूट फक्त सत्तेत असलेलेच घालू शकतात का? असे काहीही नाही," असे विजय यांनी आपल्या समर्थकांना सांगितले.

विजय प्रत्येक गोष्टीत 'ब्लॅक अँड व्हाईट' (स्पष्ट आणि पारदर्शक) असेल

आपले कपडे ही कोणती 'फॅशन स्टेटमेंट' नसून त्यामागे एक संदेश आहे, असे स्पष्ट करत विजय म्हणाले, "मी काय वेगवेगळ्या रंगांचे सूट घालतोय का? फक्त दोनच रंग आहेत, काळा आणि पांढरा (Black and White). विजय प्रत्येक गोष्टीत 'ब्लॅक अँड व्हाईट' (स्पष्ट आणि पारदर्शक) असेल, हे दाखवण्यासाठीच मी हे कपडे घालतो. मला ते सांगण्याची गरज नाही, पण तो काळा रंग काय दर्शवतो हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे."

'मी तुमचा विजय आहे'

आपल्या राजकीय प्रवासाची तुलना तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्याशी केली जाण्यावर बोलताना ते म्‍हणाले, "लोक म्हणत आहेत की, दिवंगत मुख्यमंत्री एमजीआर यांनाही त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत इतकी मतं मिळाली नव्हती. तरीही आज तुम्ही तमिळगा वेत्री कळघम पक्षाला इतका मोठा पाठिंबा दिला आहे. मी माझी तुलना एमजीआर यांच्याशी करत नाहीये; एमजीआर हे एमजीआरच आहेत; पण मी तुमचा विजय आहे, जो एमजीआर, अण्णा आणि पेरियार यांनी दाखवलेल्या मार्गावर काम करण्यासाठी आला आहे," असे ते म्हणाले.

... त्यांना सहा दिवसही शांत बसता आले नाही

विजय यांनी या सभेचा वापर द्रमुकवर थेट हल्ला करण्यासाठी केला. टीव्हीके सरकार सत्तेत येऊन अवघे काही आठवडेच झाले असतानाही द्रमुकने टीका करणे सुरूच ठेवल्याचा आरोप त्यांनी केला."मला पदभार स्वीकारून अवघे काही आठवडे झाले आहेत, तरीही जे म्हणत होते की आम्ही सहा महिने गप्प राहू, त्यांना सहा दिवसही शांत बसता आले नाही," असा टोला त्यांनी लगावला.२३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळेच त्यांचा पराभव झाला, असा आरोप करत मतदारांनी आता वेगळा राजकीय मार्ग निवडल्याचा दावा त्यांनी केला.

आता तामिळनाडूत टीव्हीके आणि द्रमुक यांच्यातच मुख्य लढत

विरोधकांकडून होणारे घोडेबाजाराचे (आमदार खरेदीचे) आरोप फेटाळत विजय यांनी, जनतेचा कौल नसतानाही द्रमुक आणि अद्रमुक (AIADMK) दोघांनीही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. AIADMK चे थेट नाव न घेता, त्यांनी आता तामिळनाडूत टीव्हीके आणि द्रमुक यांच्यातच मुख्य लढत असल्याचे संकेत दिले."राजकीयदृष्ट्या मी आजही हेच म्हणेन की, ही स्पर्धा फक्त दोन पक्षांमध्येच आहे. एक द्रमुक आणि दुसरा टीव्हीके. यामध्ये मधोमध इतर कोणासाठीही जागा किंवा भूमिका उरलेली नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT