

bihari asmita ms dhoni impact tamil nadu election prashant kishor vijay thalapathy victory
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाला थक्क करणारा कौल दिला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील 'द्रमुक' (DMK) या बलाढ्य सत्तेला सुरुंग लावत अभिनेता थलपती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे, द्रमुक नेत्यांनी उत्तर भारतीयांबद्दल, विशेषतः बिहारच्या जनतेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा वचपा मतदारांनी या निवडणुकीत काढल्याचे अधोरेखित झाले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी घेतलेली शपथ आणि 'बिहारी अस्मिते'चा मुद्दा या विजयाचे प्रमुख सूत्रधार ठरले आहेत.
ताज्या कलानुसार, अभिनेता विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने ११२ जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. अण्णा द्रमुक ५८ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, सत्तेत असलेल्या द्रमुकला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागत तिसऱ्या क्रमांकावर फेकल गेले आहे. पीएमके आणि काँग्रेसला अनुक्रमे ५ आणि ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. या निकालाने राजकीय विश्लेषकांनाही बुचकळ्यात टाकले असून, स्टालिन यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोलाथूरमध्येही खुद्द मुख्यमंत्री पिछाडीवर असल्याने द्रमुकची मोठी नाचक्की झाली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी द्रमुकला थेट आव्हान दिले होते. तामिळनाडूत एम. एस. धोनी हा सर्वात लोकप्रिय बिहारी असला तरी, द्रमुक नेत्यांनी बिहारी जनतेचा वारंवार अपमान केल्याचा मुद्दा किशोर यांनी लावून धरला होता. "बिहारी जनतेला शिव्या देणाऱ्यांना मी सल्ला देणार नाही, तर निवडणुकीत त्यांचा हिशोब चुकता करेन," असा शब्द त्यांनी दिला होता. विजय आणि त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळताना किशोर यांनी द्रमुकचा हा 'द्रविडी अहंकार' सामान्य तमिळ जनतेच्याही विरोधात जाऊ शकतो, असा प्रचार अत्यंत प्रभावीपणे राबवला.
निवडणुकीत द्रमुकच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले ते त्यांच्या नेत्यांचे बेताल वक्तव्य. द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी "हिंदी शिकणारे बिहार आणि युपीचे लोक तामिळनाडूत येऊन शौचालये साफ करतात आणि पाणीपुरी विकतात," असे वादग्रस्त विधान केले होते. याशिवाय, मंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम यांनी उत्तर भारतीय केवळ छोटी-मोठी कामे करण्यासाठीच तामिळनाडूत येतात, असे विधान करून आगीत तेल ओतले होते. ज्येष्ठ नेते दुराई मुरुगन यांनीही 'तामिळनाडू म्हणजे काही बिहार नाही' असे म्हणत बिहारचा नकारात्मक संदर्भ दिला होता. या सर्व विधानांनी उत्तर भारतीयांच्या मनात चीड निर्माण केली होती, ज्याचे रूपांतर मतपेटीतून दिसून आले.
या निकालाने तामिळनाडूच्या राजकारणात नवी समीकरणे मांडली आहेत. ज्यांना द्रमुकने 'पाणीपुरी वाले' म्हणून हिणवले, त्याच रणनीतीने आणि अस्मितेच्या मुद्द्याने राज्यातील सर्वात शक्तिशाली राजकीय यंत्रणेला पराभवाची धूळ चारली आहे. 'द्रविडी मॉडेल'च्या नावाखाली मांडलेला अहंकार मतदारांनी नाकारला असून, अभिनेता विजय यांच्या रूपाने तामिळनाडूला एक नवा चेहरा मिळाला आहे.