Terrorist Tahawwur Rana
नवी दिल्ली: मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेला दहशतवादी तहव्वूर राणाची सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत चौकशी सुरु आहे. कुटुंबाशी आणि नातेवाईकांशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयात अर्ज दाखल करुन राणाने केली आहे. या मागणीला एनआयएने विरोध केला. तर न्यायालयाने या प्रकरणीचा आदेश राखून ठेवला आहे. न्यायाधीश गुरुवारी (२४ एप्रिल) या प्रकरणी निर्णय देणार आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी म्हटले की, मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी दिल्यास तो महत्त्वाची माहिती शेअर करू शकतो. विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर राहून एनआयएने राणाच्या अर्जाला विरोध केला. हे प्रकरण महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे न्यायालयात तपास संस्थेने म्हटले. न्यायाधीशांनी या प्रकरणी सुनावणी घेतली, युक्तीवाद ऐकून घेतला असून आदेश राखून ठेवला आहे. राणाने त्यांच्या वकिलामार्फत नातेवाईकांशी बोलण्याची परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. अर्जात त्याने दावा केला की, त्याच्या कुटुंबाशी बोलणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. दरम्यान, ६४ वर्षीय दहशतवादी राणाला १० एप्रिल रोजी न्यायालयाने १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत सुनावली आहे. तपास संस्था सध्या त्याची कसून चौकशी करत आहे.
गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून मुंबई दशहतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीने भारतात येण्यापूर्वी राणासोबत संपूर्ण ऑपरेशनची चर्चा केली होती, असा दवा एनआयएने केला आहे. हेडलीने राणाला विविध माहिती देणारा ईमेल पाठवला, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले. हेडलीने राणाला या प्रकरणात आरोपी असलेले इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमान या पाकिस्तानी नागरिकांच्या कटात सहभागाची माहितीही दिली, असा दावाही एनआयएने केला आहे.