

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानात जन्मलेला, कॅनडाचा नागरिक असलेला आणि मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला गुरुवारी अमेरिकेतून खासगी चार्टर्ड बिझनेस जेटने गुप्तपणे दिल्ली येथे आणण्यात आले.
राणाला अमेरिका येथून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. राणाच्या मियामी टू इंडिया प्रवासाबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. जाणून घेऊया या गोपनीय प्रवासाबाबत...
राणा याच्या प्रत्यार्पणासाठी गल्फस्ट्रीम G550 या सुपरमिडसाईज अल्ट्रा लाँग रेंज बिझनेस जेटचा वापर करण्यात आला. अलिशान अंतर्गत रचना असलेले आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे मध्यम आकाराचे जेट विमान आहे. हे विमान व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील एका चार्टर सेवा कंपनीकडून भाड्याने घेण्यात आले होते.
या विमानाने अमेरिकेतील मियामी, फ्लोरिडा येथून स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे 2.15 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45) उड्डाण केले. त्यानंतर ते त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता (IST 9.30) बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहचले.
बुखारेस्टमध्ये 11 तासाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी 6.15 वाजता (IST 8.45) बुखारेस्टहून जेटने थेट दिल्लीकडे प्रयाण केले.
2013 साली तयार करण्यात आलेले गल्फस्ट्रीम G550 या विमानातून 19 प्रवासी प्रवास करू शकतात. यात 9 दिवाण सीट्स आणि 6 बेड आहेत. विमानातील विशिष्ट अंडाकृती खिडक्या, प्रशस्त अंतर्गत रचना आणि मोठ्या अंतरावर उड्डाण करण्याची क्षमता ही या विमानाची वैशिष्ट्ये आहेत.
याशिवाय या विमानात वायरलेस इंटरनेट, सॅटेलाईट फोन, अद्ययावत इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे.
तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण हे भारताच्या कुटनीतीचे एक महत्वाचे यश मानले जात आहे. कायदेशीरदृष्ट्यादेखील या यशाचे महत्व मोठे आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणा याचे शेवटचे अपिल फेटाळल्यावर त्याच्या भारतात हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला.
आता त्याला दिल्लीतील एका न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर भारतविरोधात युद्ध छेडणे, गुन्हेगारी कट, खून, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि UAPA अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण हे 2008 च्या मुंबई हल्ल्यांतील मृतांना न्यायासाठी भारताच्या दीर्घकालीन प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या हल्ल्यांमध्ये 166 जणांचा मृत्यू झाला होता. शेकडो लोक जखमी झाले होते.
राणा याने या हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्यांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याला गुप्त माहिती संकलन आणि योजना तयार करण्यात मदत केली होती. गेल्या दशकभरापासून भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याच्यावर बारकाईने नजर ठेऊन होत्या.