भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मला तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.  Pudhari news
राष्ट्रीय

Suvendu Adhikari : "प्रणव मुखर्जींनी मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता" : प. बंगालचे CM सुवेंदू अधिकारींचा गौप्यस्फोट

प्रणव मुखर्जी यांच्याबद्दलचा आदर हा राजकीय सीमांच्या पलीकडचा

पुढारी वृत्तसेवा

Suvendu Adhikari on Pranab Mukherjee's Advice : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मला तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका संभाषणाची आठवण सांगताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

तुला फक्त एक कर्मचारी म्हणून राहायचे असेल, तर इथेच राहा....

मंगळवारी (२४ नोव्हेंबर) कोलकात्यात आयोजित 'द इकॉनॉमिक टाइम्स बंगाल असेंड्स' शिखर परिषदेत बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी प्रणव मुखर्जी यांना आपला "मूळ सल्लागार" असे संबोधले. ते म्हणाले, "माझे मूळ सल्लागार प्रणव मुखर्जी होते. ते राष्ट्रपती झाल्यानंतर मी रायसिना हिल्सवर (राष्ट्रपती भवन) गेलो होतो. प्रणवजी मला म्हणाले होते, 'तुला नक्की काय करायचे आहे, याचा विचार कर. जर तुला फक्त एक कर्मचारी म्हणून राहायचे असेल, तर इथेच राहा; पण जर तुला स्वतःच्या बळावर पुढे जायचे असेल, तर मोदीजींसोबत जा.'"

तृणमूल काँग्रेस हा एका अर्थाने कंपनीच...

अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत कामकाजाबाबत प्रणव मुखर्जी यांचे मत सांगितले की, प्रणव मुखर्जी यांच्या मते तृणमूल काँग्रेस हा पक्ष 'आत्या-भाचा' ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी चालवत होते. तो पक्ष एका अर्थाने एक कंपनीच होता. यामध्ये एक 'मॅनेजिंग चेअरमन' आणि एक 'मॅनेजिंग डायरेक्टर' होते. तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय स्पष्ट करताना अधिकारी म्हणाले, "मीही तिथे होतो, पण मला केवळ एक कर्मचारी म्हणून राहायचे नव्हते, म्हणून मी तो पक्ष सोडला."

प्रणव मुखर्जी यांच्याबद्दलचा आदर हा राजकीय सीमांच्या पलीकडचा

"माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याबद्दलचा आदर हा राजकीय सीमांच्या पलीकडचा होता. ते माझे मार्गदर्शक आणि सल्लागार होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, प्रत्येक भारतीय व्यक्ती प्रणव मुखर्जी यांचा आदर करते," असेही अधिकारी यांनी नमूद केले.

प्रणव मुखर्जी यांच्याबद्दलची विधाने वाद निर्माण करू शकतात: अधिकारी

माझी आणि प्रणव मुखर्जी यांच्यातील चर्चा नेमकी केव्हा झाली, या प्रश्नावर सुवेंदू अधिकारी यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला. "मला याबद्दल फार काही बोलायचे नाही. ते आता आपल्यात नाहीत. यावरून वाद निर्माण होऊ शकतो, म्हणून मी अधिक काही सांगू इच्छित नाही," असे ते म्हणाले.

मुखर्जी यांच्या निधनानंतर अधिकारींचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या काळात भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. २०२० मध्येच सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी अभिषेक बॅनर्जी (ममता बॅनर्जींचे भाचे) यांचे पक्षावरील वर्चस्व असल्याचे कारण दिले आहे.

२०२१ विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारी बनले भाजपचा प्रमुख चेहरा

२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांना १,९५६ मतांनी पराभूत केले. भाजप या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांना टीएमसीच्या २१३ जागांच्या तुलनेत केवळ ७७ जागा मिळाल्या, तरीही अधिकारी हे राज्यातील भाजपचे सर्वात प्रमुख चेहरा म्हणून समोर आले आणि ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले.

अधिकारी बनले भाजपचे पहिले मुख्यमंत्री

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत, टीएमसीच्या १५ वर्षांच्या राजवटीविरुद्ध भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करण्यात अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपने राज्यातील २९४ पैकी २०७ जागा जिंकल्या, तर अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात, भवानीपूरमध्ये पराभूत केले. त्यानंतर ते पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT