Abhijeet Dipke Message to PM Modi Pudhari
राष्ट्रीय

Abhijeet Dipke: 'सुबह हो गई मामू'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CJP कडून जल्लोष, अभिजीत दिपकेचा पंतप्रधानांना मेसेज

Abhijeet Dipke Message to PM Modi: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke Message to PM Modi: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलनकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी या घडामोडीला "लोकशाहीचा विजय" असे संबोधत, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे म्हणले आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित समर्थकांना संबोधित करताना दिपके म्हणाले की, हा विजय शांततापूर्ण लोकशाही मार्गाने लढलेल्या विद्यार्थ्यांचा आहे. सामान्य नागरिक एकत्र आले तर सत्ताधाऱ्यांनाही जबाबदार धरता येते, हे या आंदोलनाने सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांवरही टीका

यावेळी अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत "सुबह हो गई मामू" अशी टिप्पणी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. तुम्ही घाबरलात नाही, सरकारपुढे झुकलात नाही, तर कोणाचाही राजीनामा घेऊ शकता, हे या आंदोलनाने दाखवून दिले."

"आंदोलन अजून संपलेले नाही"

मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन संपणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी केवळ एक मागणी पूर्ण झाली असून उर्वरित दोन मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.

त्यांच्या म्हणण्यानुसार, NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी आणि 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान कारवाई करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या दोन प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.

CJP ची भूमिका कायम

आंदोलनस्थळी CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि मुख्य प्रवक्ते सौरव दास हे देखील उपस्थित होते. रांका यांनी सांगितले की, पक्षाचे उद्दिष्ट केवळ एका मंत्र्याचा राजीनामा मिळवणे नसून, भारतातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे आहे.

सरकारने पक्षाच्या तिन्ही मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संध्याकाळी देशभर शांततापूर्ण कँडल मार्च काढण्याची परवानगी मागितल्याची माहितीही त्यांनी दिली.

"लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच"

मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारला इशारा देत सांगितले की, सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलनस्थळ सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

भाषणादरम्यान अभिजीत दिपके यांनी NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांना दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

चर्चेपूर्वीच राजीनामा

केंद्र सरकार आणि CJP यांच्यात तिसऱ्या फेरीची चर्चा होण्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीपासूनच शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही 'तडजोड न करता येणारी' प्रमुख मागणी असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, आपल्या राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परिस्थितीचा गैरफायदा राष्ट्रविरोधी शक्तींनी घेऊ नये म्हणून आपण पद सोडत असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे आपण व्यथित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT