E20 Petrol Protest: E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी चालकांचा एल्गार; संसदेवर मोर्चाची घोषणा, सरकारकडे मोठ्या मागण्या

E20 Petrol Protest: दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली असून E20 पेट्रोल धोरणाचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी केली आहे.
E20 Petrol Protest
E20 Petrol ProtestPudhari
Published on
Updated on

E20 Petrol Protest: देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसदेकडे मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी हातात ऊस घेऊन सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे मायलेज कमी झाले असून देखभाल खर्च वाढल्याच्या आणि इंजिनच्या कार्यक्षमतेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या तक्रारी देशभरातून येत आहेत.

त्यांनी असा दावा केला की, 2015 पूर्वी तयार झालेली अनेक वाहने इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी डिझाइन केलेली नाहीत. त्यामुळे अशा वाहनधारकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

"...पण मिळतेय मिश्रित इंधन"

संजय सम्राट यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, ग्राहक पेट्रोलसाठी पूर्ण किंमत मोजत असताना त्यांना इथेनॉल मिश्रित इंधन का दिले जाते, असा प्रश्न अनेक वाहनचालक उपस्थित करत आहेत. वाढत्या इंधन खर्चासोबतच इतर नियमांमुळेही व्यावसायिक वाहनधारकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

E20 धोरणाचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी

असोसिएशनने स्पष्ट केले की, संसद मोर्चाद्वारे E20 इथेनॉल मिश्रण धोरणाचा स्वतंत्र वैज्ञानिक आढावा घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत वाहनधारक, ग्राहक, वाहतूक व्यावसायिक, वाहन उत्पादक आणि तांत्रिक तज्ज्ञांचा सहभाग असावा, अशी त्यांची भूमिका आहे.

E20 Petrol Protest
Supreme Court: मोठा निर्णय! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाची एन्ट्री; 27 जुलैला होणार महत्त्वाची सुनावणी

इतर मागण्याही मांडल्या

असोसिएशनचे सदस्य जितेंद्र बॉबी यांनी ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या टॅक्सी आणि बससाठी लागू असलेल्या 80 किमी प्रतितास वेगमर्यादेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.

त्यांच्या मते, आधुनिक द्रुतगती महामार्गांवर खासगी वाहनांना अधिक वेगाने प्रवासाची परवानगी असताना व्यावसायिक पर्यटन वाहनांवर कमी वेगमर्यादा लादल्याने व्यवसाय, प्रवासी सेवा आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

याशिवाय असोसिएशनने खालील मुद्द्यांवरही सरकारला पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे:

  • E20 इथेनॉल मिश्रण धोरणाचा स्वतंत्र आढावा

  • पॅनिक बटण आणि वाहन लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLTD) अंमलबजावणीची चौकशी

  • पर्यटन वाहनांसाठी 80 किमी प्रतितास वेगमर्यादेचा पुनर्विचार

  • जुन्या वाहनांवरील स्क्रॅपेज धोरणाचे पुनर्मूल्यांकन

  • BS-IV डिझेल पर्यटन वाहनांवरील निर्बंधांचा आढावा

  • वाढीव टोल दरांमध्ये कपात

E20 Petrol Protest
NEET Paper leak : 'नीट' पेपर लीकप्रकरणी केंद्र सरकारची मोठी कारवाई, NTA च्या ४७ भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी

हजारो चालक सहभागी होण्याची शक्यता

असोसिएशनने देशभरातील इतर टॅक्सी आणि ट्रक संघटनांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चात हजारो टॅक्सी चालक आणि ट्रकचालक सहभागी होतील, असा दावा संघटनेने केला आहे.

आंदोलन राजकीय नसल्याचा दावा

संजय सम्राट यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि व्यावसायिक वाहनधारकांच्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व संबंधित घटकांशी संवाद साधून या मुद्द्यांवर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news