Dharmendra Pradhan resignation: विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकलं; अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

'नीट-यूजी २०२६' परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज राजीनामा दिला आहे.
Dharmendra Pradhan resignation
Dharmendra Pradhan resignationPudhari Photo
Published on
Updated on

Dharmendra Pradhan resignation

नवी दिल्ली: 'नीट-यूजी २०२६' परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपर फुटल्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (दि. २५) केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाचा हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

तरूणांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?

देशातील तरूणांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, जंतरमंतर आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी काम केले आहे. एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदर्शी शिक्षण व्यवस्था हाच एका सशक्त राष्ट्राचा पाया असतो, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने पूर्ण करणे ही राजकीय आणि सामाजिक जीवनातील आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी राहिली आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो," असे प्रधान म्हणाले.

"देशविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये"

"जंतरमंतर आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता यात देशविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी अभ्यासावर व करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, या सर्व गोष्टींचा विचार करून मी पंतप्रधानांकडे माझा राजीनामा पाठवला आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.

Dharmendra Pradhan resignation
Anti Paper Leak Bill : 10 वर्षे कारावास, 10 कोटींचा दंड, 3 महिन्यांत निकाल

पर्यावरण आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आपले २६ दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 'नीट' परीक्षा प्रकरणावरून 'सीजेपी' गेल्या काही दिवसांपासून जंतर-मंतरवर आक्रमक आंदोलन करत आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला होता.

केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यातील चर्चेची फेरी शुक्रवारी निष्फळ ठरली होती. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना बडतर्फ करावे, या मागणीवर 'सीजेपी' ठाम होती. प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला होता. शुक्रवारी त्यांच्या एका शिष्टमंडळाने सरकारकडून संवाद साधत असलेले जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा चर्चेची फेरी होणार होती. तत्पूर्वीच प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अभिजित दिपके काय म्हणाले?

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके म्हणाले की, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा या गोष्टीचा पुरावा आहे की, जर तुम्ही घाबरला नाहीत आणि या सरकारसमोर झुकला नाहीत, तर आम्ही कोणाचाही राजीनामा घेऊ शकतो."

"घाबरण्याची काहीच गरज नाही. ही लोकशाही आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. आम्ही असेच माघार घेणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, पण ज्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्या सर्व कुटुंबांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, २० तारखेला ज्या पोलीस गुंडांनी कारवाई केली होती, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे." अशी मागणी दीपके यांनी केली आहे.

देशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश : सुप्रिया सुळे

अखेर सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. या देशातील तरुण काय करू शकतात हे दाखवून दिले आहे. आपण सर्वांनीच शिक्षण क्षेत्राकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

Dharmendra Pradhan resignation
FRS : जंतर-मंतरवर आले 2,000 गुन्हेगार? पोलिसांच्या दाव्यावर CJPचा पलटवार – “आम्हीही तुमची यादी देऊ”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news