प्रातिनिधिक फोटो.  
राष्ट्रीय

Godrej Vs Harpic: 'टाॅयलेट क्लिनर'च्या बाटलीवरुन दोन बलाढ्य कंपन्या हायकोर्टात भिडल्या, निकाल कोणाच्या बाजूने?

calcutta high court latest judgement on Godrej: गोदरेज कंपनीलाला विशिष्ट आकाराच्या बाटल्या उत्‍पादनास अंतरिम बंदी

पुढारी वृत्तसेवा

वस्तूच्या डिझाइनची मुदत संपली म्हणजे त्याचा आकार सर्वांसाठी खुला होत नाही, असे कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

Godrej Vs Harpic RECKITT BENCKISER Case Bottle Design

कोलकाता : "एखाद्या वस्तूच्या डिझाइनचे अधिकार संपुष्‍टात आला असला तरीही त्या कंपनीला आपल्या विशिष्ट आकाराच्या ट्रेडमार्कचे संरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार असतो," असे स्‍पष्‍ट करत गोदरेज कंपनीच्‍या 'स्पिक' (Spic) टॉयलेट क्लीनरची बाटली ही 'हार्पिक'च्या बाटलीसारखीच हुबेहूब दिसत आहे. त्‍यामुळे हार्पिकच्या नोंदणीकृत बाटलीच्या आकाराची नक्कल करून केले जाणारे उत्‍पादन गोदरेज कंपनीने स्‍थगित करावे, असा आदेश बुधवारी (दि. २५) कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे आता खटला सुरू असेपर्यंत गोदरेजला विशिष्ट आकाराच्या बाटल्या वापरता येणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

रेकिट बेंकाइझरने घेतली होती उच्‍च न्‍यायालयात धाव

'लाईव्‍ह लॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसर हार्पिकचे उत्‍पादन करणारी कंपनी 'रेकिट बेंकाइझर' कंपनीने दावा केला होता की, "२००२ पासून हार्पिकच्या बाटलीचे डिझाइन हे नोंदणीकृत होते. आता या डिझाइनची मुदत संपली असली, तरी 'ट्रेडमार्क कायदा १९९९' अंतर्गत या आकाराला अद्याप संरक्षण प्राप्त आहे. गोदरेज कंपनीने आपल्‍या टॉयलेट क्‍लीनरची बाटलीत जाणीवपूर्वक हार्पिकच्या बाटलीचा आकार, ठेवण आणि टोपण यांची हुबेहूब नक्कल केली आहे. ट्रेडमार्क कायदा १९९९ नुसार आपल्याला संरक्षण मिळावे. गोदरेज कंपनीला तत्‍काळ या उत्‍पादनावर बंदी घालण्‍याचे आदेश देण्‍यात यावी, अशी मागणी उच्‍च न्‍यायालयात दाखल करण्‍यात आलेल्‍या याचिकेतून करण्‍यात आली होती.

गोदरेज कंपनीने केले हार्पिक उत्‍पादनाची नक्‍कल : 'रेकिट बेंकाइझर'

रेकिटच्या वकिलांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की, गोदरेज ही कंपनी या व्यवसायात नवीन असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हार्पिक उत्पादनाची नक्कल केली आहे. त्यांनी हार्पिकच्या बाटलीचा आकार, टोपी आणि त्यावरील रंगसंगती (ट्रेड ड्रेस) यांची हुबेहूब कॉपी केल्याचा आरोप रेकिटनी केला.

हार्पिक बाटलीच्या डिझाइनचे कायदेशीर संरक्षण संपुष्‍टात : गोदरेज

गोदरेजने रेकिटच्या आरोपांना उत्तर देताना असे स्पष्ट केले की, हार्पिक बाटलीच्या डिझाइनला मिळणारे कायदेशीर संरक्षण आता संपुष्टात आले आहे. त्यांच्या मते, रेकिटकडे बाटलीच्या विशिष्ट आकारासाठी कोणतीही अधिकृत ट्रेडमार्क नोंदणी नसून, त्यांची सध्याची नोंदणी केवळ बाटलीवरील लेबल किंवा लोगोपुरतीच मर्यादित आहे. याशिवाय, अशा प्रकारच्या बाटलीचा आकार आता बाजारपेठेत सर्वसामान्य झाला असून तो अनेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कायद्याच्या कलम १७ चा संदर्भ देत गोदरेजने असा युक्तिवाद केला की, एखादी कंपनी केवळ त्यांच्या संपूर्ण ट्रेडमार्कवरच आपला हक्क सांगू शकते; बाटलीचे टोपी किंवा विशिष्ट वळण यांसारख्या सुट्या भागांवर स्वतंत्रपणे मालकी हक्क गाजवता येत नाही.

उच्‍च न्‍यायालयाने दिला सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निकाला हवाला

'रेकिट बेंकाइझर' कंपनीने दाखल केलेल्‍या याचिकेवर न्‍यायामूर्ती रवी कृष्‍ण कपूर यांच्‍या एकलपीठासमोर सुनवणी झाली. यावेळी एकलपीठाने 'सुपर स्मेल्टर लिमिटेड' विरुद्ध 'श्रीजन प्रायव्हेट लिमिटेड' या २००९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत असे स्पष्ट केले की, एखाद्या वस्तूच्या डिझाइनवरील विशेष हक्क (मक्तेदारी) संपला तरीही, त्यावरील नोंदणीकृत चिन्हाचा किंवा ब्रँडच्या ओळखीचा ट्रेडमार्क म्हणून असलेला अधिकार कायम राहू शकतो.

मुदत संपली याचा अर्थ डिझाइन सर्वांसाठी खुली झाली असा नाही

न्यायमूर्ती कपूर यांनी स्‍पष्‍ट केले की, एखाद्या वस्तूच्या डिझाइनची मुदत संपली म्हणजे त्याचा आकार सर्वांसाठी खुला (सार्वजनिक) होतो, असे मानणे चुकीचे आहे,डिझाइन कायदा २००० हा जरी मक्तेदारी मर्यादित करण्यासाठी असला, तरी डिझाइनवरील हक्क संपले तरी त्या चिन्हावर ट्रेडमार्क म्हणून मालकी हक्क असू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. २८ नुसार न्यायालयाने असे मानले की, एकदा का एखाद्या कंपनीने वैध नोंदणी प्रमाणपत्र सादर केले, तर त्यांना त्या चिन्हासाठी आपोआप कायदेशीर संरक्षण प्राप्त होते.

ग्राहकांची फसवणूक होण्‍याची शक्‍यता

न्‍यायालयाने दोन्‍ही उत्‍पादनांची तुलना करत स्‍पष्‍ट केले की, त्यांचा आकार एकमेकांशी हुबेहूब मिळताजुळता आणिएक सारखाच आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचा गोंधळ होऊ शकतो आणि त्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे, असे स्‍पष्‍ट करत न्‍यायालयाने गोदरेज कंपनीला स्पिक' (Spic) टॉयलेट क्लीनरची बाटली उत्‍पादनावर अंतरिम बंदीचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १६ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT