राष्ट्रीय

Sonam Wangchuk : "२०१४ मधील आश्‍वासनाची पूर्तता करा..." : सोनम वांगचुक यांनी PM मोदींकडे नेमकी कोणती मागणी केली?

आपले नेतेच भरकटलेले असतील, तर 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने संपूर्ण देश भरकटतो

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk PM Modi 2014 promise : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या २०१४ मधील एका आश्वासनाची आठवण करून दिली आहे. हे आश्वासन पुढील एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

... तर 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने संपूर्ण देश भरकटतो

संसदेच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत वांगचुक म्हणाले, "संसदेत प्रत्येक दुसऱ्या खासदारावर कोणताही ना कोणताही गुन्हा दाखल असेल आणि प्रत्येक तिसऱ्या खासदारावर बलात्कार व हत्या यांसारखे गंभीर गुन्हे नोंद असतील, तर आपण संसदेचे 'गुन्हेगारीकरण' कसे रोखणार? ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मी याच संदर्भात तुमच्याकडे मदतीची विनंती करत होतो. कारण, आपले नेतेच भरकटलेले असतील, तर 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने संपूर्ण देश भरकटतो."

...तर गुन्हेगार तुरुंगात आणि निर्दोष संसदेत असतील!

पंतप्रधान मोदींच्या २०१४ मधील एका मुलाखतीची व्हिडीओ क्लिप दाखवत वांगचुक म्हणाले, "तुम्ही हा व्हिडीओ अतिशय काळजीपूर्वक पाहा. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका सहकाऱ्याशी याच विषयावर चर्चा करत होतो. त्यांनी मला एक अतिशय उत्तम सल्ला दिला. असे लोक आपल्या संसदेत टिकून कसे राहतात, हे आधी आपण समजून घेतले पाहिजे. कायदा सांगतो की, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष असतो . याच तत्त्वाचा आडोसा घेऊन असे राजकीय नेते ५ ते १० वर्षे काढतात; कारण आपल्या देशात न्याय मिळायला १० ते १५ वर्षांचा कालावधी लागतो."

खासदार आणि आमदारांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट हवीत

"माझ्या सहकाऱ्याने असा सल्ला दिला की, खासदार आणि आमदारांसाठी देशात अतिशय जलद गतीने काम करणारी न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) असायला हवीत, जी ६ महिने ते १ वर्षाच्या आत निर्णय देतील. यामुळे कोण गुन्हेगार आहे आणि कोण निर्दोष, हे स्पष्ट होईल. असे झाले तर गुन्हेगार तुरुंगात जातील आणि निर्दोष लोक संसदेत राहतील. मला हा सल्ला खूप आवडला."

'पंतप्रधानांकडे या भेटवस्तूची मागणी करा'

नागरिकांना आवाहन करत वांगचुक म्हणाले, "मी ही गोष्ट तुम्हा सर्वांशी शेअर करणार होतो, जेणेकरून आपण सरकारकडे आणि पंतप्रधानांकडे अशा विशेष न्यायालयांची मागणी करू शकू. याच दरम्यान मला पंतप्रधानांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ मिळाला. मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी हे आश्वासन का पूर्ण केले नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यासाठी मी हा व्हिडीओ बनवत नाहीये. 'जेव्हा जाग आली तीच पहाट' या विचारावर माझा विश्वास आहे. आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानांकडे ही मागणी करावी, म्हणूनच मी हा व्हिडीओ तयार करत आहे."

एक वर्षात आश्‍वसनाची पूर्तात देशवासीयांसाठी मोठी भेट ठरेल

"२०२६ च्या १५ ऑगस्टपासून ते २०२७ च्या १५ ऑगस्टपर्यंत... या एका वर्षात जरी तुम्ही हे काम पूर्ण केले, तर देशासाठी स्वातंत्र्यदिनाची ती सर्वात मोठी भेट ठरेल. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करत आपण आपल्या पंतप्रधानांकडे या भेटीची मागणी करूया. ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी हा व्हिडीओ नक्की शेअर करा," असे आवाहनही त्यांनी केले.

१२ वर्षांत भ्रष्टाचार आणि अन्यायाने रूप बदलले

शुक्रवारी सोनम वांगचुक म्हणाले होते की, "२०१४ मध्ये तुम्ही एक नवीन सरकार सत्तेवर आणले. मात्र, गेल्या १२ वर्षांत भ्रष्टाचार आणि अन्यायाने आपले रूप बदलले आहे. तो पूर्वीपेक्षा दुप्पट, तिप्पट मोठ्या रूपात आज आपल्यासमोर उभा आहे आणि आपल्याला घाबरवत आहे. अशा स्थितीत एका मोठ्या बदलाची, एका क्रांतीची गरज आहे, जेणेकरून आपण योग्य नेत्यांना पुढे आणू शकू."

मी कोणत्याही विशिष्ट पक्षाबद्दल किंवा पक्ष-विरोधाबद्दल बोलत नाहीये

"मी कोणत्याही विशिष्ट पक्षाबद्दल किंवा पक्ष-विरोधाबद्दल बोलत नाहीये, तर देशाबद्दल बोलत आहे. आगामी निवडणुकांमध्ये असे नेते पुढे आले पाहिजेत, जे खरोखर देशाला योग्य दिशा दाखवू शकतील. यासाठी मला देशातील सर्वोत्तम मेंदू, बुद्धिजीवी आणि विचारवंत यांना एकत्र आणायचे आहे. ज्यांचे चरित्र निष्कलंक आहे आणि जे तत्त्वांवर चालतात, अशा लोकांना मला भेटायचे आहे. ते कुठे आहेत, कोण आहेत, हे मला माहिती नाही; त्यात तुम्ही मला मदत करू शकता. तुम्ही अशी नावे सुचवा. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुमच्या सूचना जाणून घेण्यासाठी मी तुमच्या शहरांमध्ये येऊ इच्छितो," असेही वांगचुक यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT