Narendra Modi On War: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत महत्त्वाचे भाषण करत भारताची भूमिका स्पष्ट केली. मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा, व्यापार आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत भारताने संतुलित भूमिका घेत कूटनीती आणि संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधानांनी सांगितलं की, होर्मुज सामुद्रधुनीत कोणताही अडथळा तयार करणे भारताला मान्य नाही. कारण देशातील मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल, गॅस आणि खतांची आयात या मार्गावर अवलंबून आहे. या मार्गावर परिणाम झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारत सरकार विविध देशांशी सतत संपर्कात असून, पर्यायी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आधी २७ देशांकडून होणारी आयात आता ४१ देशांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या संकटाच्या काळात भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. यामुळे तात्पुरत्या अडचणींचा सामना करण्यास देश सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय सरकारने एक विशेष गट स्थापन केला असून तो दररोज बैठक घेऊन आयात-निर्यात, पुरवठा आणि लॉजिस्टिकमधील अडचणींचा आढावा घेत आहे.
पश्चिम आशियातील देशांमध्ये सुमारे १ कोटी भारतीय काम करत असल्याने त्यांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ३ लाख ७५ हजार भारतीयांना सुरक्षितपणे देशात परत आणण्यात यश मिळालं आहे. तसेच युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी २४x७ हेल्पलाइन आणि विशेष मिशनद्वारे काम सुरु आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशांतर्गत परिस्थितीवरही लक्ष केंद्रित केलं. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्य सरकारांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या असून आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, विरोधकांकडून या मुद्द्यावर सतत चर्चा करण्याची मागणी होत असताना पंतप्रधानांनी सरकारची तयारी आणि उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, या संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी पेट्रोलियम, वीज, खत आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. जागतिक तणावाच्या या पार्श्वभूमीवर भारताने संयम, कूटनीती आणि व्यावहारिक मार्ग स्वीकारला असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू आहे.