

Gold Price Crash 2026: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या बाजारात भूकंप झाला आहे. यामुळे अनुभवी गुंतवणूकदारही चक्रावले आहेत. अवघ्या काही दिवसांत या मौल्यवान धातूंच्या किमती ज्या वेगाने कोसळल्या आहेत, तसा कल मागील चार दशकांत क्वचितच पाहायला मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी विक्रमी उच्चांक गाठणारे सोने अचानक घसरल्याने बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. भारतासारख्या देशात, सोने हे केवळ गुंतवणूक नसून परंपरा आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. ही घसरण धोक्याची घंटा आहे की स्वस्तात खरेदीची मोठी संधी?
आंतरराष्ट्रीय बाजारात १३ मार्चला सुमारे ५,२०० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करणारे सोने २३ मार्चपर्यंत थेट ४,३५० डॉलरच्या आसपास घसरले. याआधी या धातूने ५,५९५ डॉलरचा सर्वकालीन उच्चांकही गाठला होता. काही सत्रांमध्ये तर किंमत ४,३२० डॉलरपर्यंत खाली आली, ही जानेवारीनंतरची नीचांकी पातळी मानली जाते. या घसरणीमुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतीय बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमतीत सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाली आणि दर २,१३,००० रुपयांच्या आसपास पोहोचले. सोन्याचे एप्रिल डिलिव्हरी करारही सुमारे ५ टक्क्यांनी स्वस्त झाले आणि १० ग्रॅमसाठी १.३७ लाख रुपयांच्या आसपास आले. दिल्लीच्या स्पॉट मार्केटमध्येही ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोने सुमारे ६ हजार रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीत तब्बल १५ हजार रुपयांची घट झाली.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, जागतिक स्तरावर तणावाचं वातावरण असतानाही सोन्याने अपेक्षित ‘सेफ-हेवन’ची भूमिका निभावलेली दिसत नाही. साधारणपणे युद्ध किंवा अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे धाव घेतात. मात्र सध्या डॉलरची तेजी आणि वाढलेले ‘रिअल यिल्ड्स’ यामुळे सोन्यावर दबाव आला आहे. काही देशांच्या अर्थव्यवस्था तर तरलतेच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी सोने विकत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना काय करावं हे कळतं नाही. मात्र काही तज्ज्ञ याकडे संधी म्हणून पाहत आहेत. त्यांच्या मते, ही घसरण म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ‘गोल्डन चान्स’ असू शकतो. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक (staggered buying) केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो, असा सल्ला दिला जात आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार, सोने अजून थोडं खाली येऊ शकतं आणि त्यानंतरच स्थिरता येण्याची शक्यता आहे.
नोंद: सोन्या-चांदीच्या या ऐतिहासिक घसरणीमुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.