लखनौ येथील व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या हत्या प्रकरणाने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, मॉडेल श्रद्धा दुबे नेपाळला पसार झालाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Shraddha Dubey businessman murder case
लखनौ येथील व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या हत्या प्रकरणाने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, मॉडेल श्रद्धा दुबेच्या मागील अनेक गुन्ह्यांची माहिती हळूहळू समोर येत आहे. फरार श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा चालक दानिश (उर्फ तन्वीर) यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तैनात केली आहेत, तसेच त्यांच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास प्रत्येकी २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या हत्येनंतर श्रद्धा दुबे हिने उत्तर प्रदेशातील अनेक बडे बिल्डर्स, प्रसिद्ध व्यक्ती आणि इव्हेंट कंपन्यांच्या मालकांशी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आता दुबेच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली असून, काहींना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे.
श्रद्धा आणि तिच्या बहिणीच्या कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पोलिसांनी २० मोबाईल क्रमांक निश्चित केले आहेत. गुन्ह्यानंतर मदत मागण्यासाठी या बहिणींनी या क्रमांकांवर संपर्क साधल्याचा आरोप आहे. या दोघी नेपाळला पळून गेल्या असाव्यात या शक्यतेमुळे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बहराइच, नौतनवा आणि पीलीभीत सीमांवर पोलीस आणि निमलष्करी दलांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे.
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी आपले संबंध असल्याचा दावा करत श्रद्धाने शिवा शर्माला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती. या धमकीशी संबंधित एक ऑडिओ क्लिप मंगळवारी व्हायरल झाली. श्रद्धा दुबे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावे वापरून लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी श्रद्धाचा फोटो आणि वैयक्तिक तपशील शेअर करून विमानतळ प्रशासनाला सतर्क केले आहे. कोणी या नावाने प्रवास करण्याचा प्रयत्न केला किंवा कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान हे नाव समोर आले, तर त्वरित हजरतगंज पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
श्रद्धा, तिची बहीण आणि त्यांचा चालक यांना अटक करण्यासाठी सध्या पोलिसांची दहा पथके कार्यरत आहेत. चालक आणि इतर काही संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके लखनौ आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये छापे टाकत आहेत. नेपाळ सीमेजवळही अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. श्रद्धाला मदत करणाऱ्या व्यक्तींची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. पोलीस उपायुक्त (मध्य) विक्रांत वीर यांच्या माहितीनुसार, आरोपी श्रद्धा, तिची बहीण आणि चालक यांच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास प्रत्येकी २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलीस पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत; तसेच काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
व्यावसायिक शिवा शर्मा हे श्रद्धासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. गेल्या आठवड्यात एका सोसायटीतील फ्लॅटवरून पडून त्यांचा मृत्यू झाला; खाली पडताना त्यांनी केवळ अंतर्वस्त्रे परिधान केली होती. मॉडेल श्रद्धा आणि इतरांनी आपल्या मुलाला इमारतीवरून खाली फेकून दिल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे. शिवा यांच्या आई, रंजना यांनी आरोप केला आहे की, श्रद्धाने त्यांच्या मुलाला एका खोट्या प्रकरणात अडकवले, त्याला सिगारेटने चटके दिले आणि माफिया व प्रभावशाली व्यक्तींकडून त्याला धमकावले. त्यांनी श्रद्धा आणि तिची बहीण रश्मी यांच्यासह चार जणांविरुद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी श्रद्धाच्या फ्लॅटमधून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या; यामध्ये 'सेक्स टॉईज', लैंगिक क्षमता वाढवणारी औषधे, अमली पदार्थांच्या गोळ्या आणि इतर साहित्याचा समावेश होता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, मॉडेल श्रद्धा त्या फ्लॅटमधून एक अवैध धंदा चालवत होती. विविध व्यावसायिक आणि बिल्डरांशी तिचे संबंध असल्याचे पुरावेही समोर आले आहेत.