Belgaum Crime : कट रचून पतीचा खून; तरीही लग्नासाठी प्रेमी युगुलाला पॅरोल

हिंडलगा कारागृहातून एक दिवसाची मुभा; तीन वर्षांपूर्वी दोघांनी मिळून केला खून
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : कट रचून पहिल्या पतीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रेमी युगुलाला विवाह करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने एक दिवसाचा पॅरोल (कारागृहातून मुक्तता) मंजूर केला आहे. मानवतेच्या आधारे कायदेशीर हक्क नाकारता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा आदेश दिला. त्यानुसार प्रेमी युगुलाला लग्न करण्यासाठी एक दिवसाकरिता तुरुंगातून मुक्त करण्यात येणार आहे. हे युगुल हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत आहे. तीन वर्षांपूर्वी या युगुलाने महिलेच्या पतीचा खून केला होता.

श्रीधर तळवार आणि सिद्धव्वा (प्रियांका) अशी त्यांची नावे आहेत. ते मुडलगी तालुक्याचे रहिवाशी आहेत. त्यांनी विवाह करण्यासाठी ९० दिवसांच्या पॅरोलची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एम. जे. एस. कमल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी यापूर्वी सुमारे तीन वर्षे, पाच महिने आणि २५ दिवस शिक्षा भोगली असून, तुरुंगातील त्यांच्या वर्तनाबाबत कोणतीही प्रतिकूल नोंद नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

दोघांना विवाहासाठी पॅरोल देण्यास कोणतीही मनाई नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने नैतिकतेच्या आधारावर त्यांचा कायदेशीर हक्क नाकारता येणार नाही, असे नमूद केले. कैद्यांना कुटुंबीय व सामाजिक संबंध टिकवून ठेवण्याची संधी देणे हा त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

तुरुंगाच्या आवारात विवाह करण्यास नियमांनुसार परवानगी नसल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवादही न्यायालयाने विचारात घेतला. त्यामुळे दोघांना विवाहाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एक दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. विवाहस्थळी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही कैद्यांनी हिंडलगा तुरुंगात परतणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आठवडाभरात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news