Daughter kills Mother for gov Job: वडिलांच्या निधनानंतर ज्या आईने संपूर्ण कुटुंब सांभाळलं तिला ठार मारण्याची सुपारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर स्वतःच्याच मुलीनं दिली. यासाठी मुलीला काका अन् चुलत भावाची देखील साथ लाभली. अखेर पोलिसांना सुगावा लागला अन् तपासात या क्राईम थ्रिलर स्टोरीचा एक एक पदर उलगडत गेला.
या प्रकरणी २३ वर्षाची आरोपी आयुषीला ताब्यात घेतलं असून तिला आपली विधवा आई नीरज शर्माची हत्या फक्त तिच्या सरकारी नोकरीसाठी अन् संपत्तीसाठी करायची होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने रागाच्या भरात किंवा कोणत्या कौटुंबिक वादातून आपल्या आईला संपवलं नाही तर थंड डोक्यानं तीन महिने आपल्या आईला मारण्याचं प्लॅनिंग केलं गेलं. या नराधम मुलीने प्रत्येक पाऊल विचार करून टाकलं. माणसं गोळा केली गेली आणि गाडीची सोय करून हा कसा रस्ते अपघात आहे हे दाखवण्यात आलं.
तपासात असं समोर आलं आहे की नीरज शर्मा यांचे पती विजय कुमार शर्मा हे न्यायालयात लोव्हर डिव्हिजन क्लर्क होते. एका वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी कुटुंब आर्थिक संकटात आलं. अनुकंपा तत्वावर विजय कुमार यांच्या पत्नी नीरज यांना सरकारी नोकरी मिळाली. मात्र पोलिसांच्या दाव्यानुसार ही सरकारी नोकरची मुलगी आयुषीची सर्वात मोठी महत्वकांक्षा बनली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषीला सतत वाटत होतं की तिच्या आईच्या मृत्यूनंतर ती सरकारी नोकरी तिला मिळेल. त्याचबरोबर आईच्या नावावर असलेली सर्व संपत्ती देखील तिला मिळेल. या लालसेपोटी आयुषी आईच्याच जीवावर उठली. तिने सर्व नाती गोती बसनात गुंडाळून ठेवली.
आयुषीने आपले काका मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांना देखील या कटात सामील करून घेतलं. या घटनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेक क्लुप्त्यांचा आणि मार्गांचा विचार केला गेला. शेवटी नीरज यांना मारण्यासाठी रस्ते अपघाताचा बनाव करण्याचं ठरलं.
या कटाची सुरूवातीला भाड्याच्या एसयुव्ही घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ही योजना सफल झाल ीनाही. त्यानंतर दुसऱ्या गाडीची सोय करून अनेक दिवस नीरज यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कट तडीस लावण्यासाठी भरतपूरचे रहिवासी हेमंत शर्मा याला ७ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली. हेमंतने आपल्या चार साथीदारांसह ही कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न केला. या टीमकडे एकच जबाबदारी होती की त्यांना नीरज यांना एका वेगवान गाडीनं उडवलं असं भासवायचं होतं.
३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी नीरज आपला दिव्यांग मुलाला कोचिंगला सोडून घरी परतत होत्या. त्यावेळी त्यांना एका वेगवान एसयुव्हीने जोरदार धडक दिली. पोलिसांच्या मते गाडी जवळपास १३० किलोमीटर वेगानं धावत होती. टक्कर इतकी भीषण होती की नीरज या जवळपास १०० फूट लांब उडून पडल्या. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. चालक वाहन घेऊन तेथून फरार झाले.
सुरूवातीला हे प्रकरण हीट अँड रनचं दिसत होतं. मात्र नीरज यांचा भाऊ राकेश शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार करत माझ्या बहिणीची हत्या झाली आहे असा आरोप केला. नीरज यांनी अनेकवेळा तिची मुलगी आयुषी, सासू आणि पुतण्या बलराम संपत्तीवरून तिला छळत होते.
आईला आपल्या मृत्यूची होती भीती
पोलिसांच्या तपासात नीरज यांनी आपल्या भावाकडे आयुषीचे वागणे सतत हिंसक होत आहे. त्यांच्या सोबत काहीतरी मोठी घटना होईल अशी शंका व्यक्त केली होती. हेच वक्तव्य पोलिसांच्या तपासात महत्वाचा आधार ठरलं.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच आरोपींच्या हालचाली यांचे विश्लेषण केलं. जसजसा तपास पुढे सरकू लागला तसतसा हा कट समोर येऊ लागला. आयुषी, तिचे काका मोहन स्वरूप, सुपारी किलर हेमंत शर्मा आणि चार साथीदारांना अट करण्यात आली. चुलत भाऊ बलराम मात्र अजून फरार आहे. हत्येत वापरण्यात आलेली एसयुव्ही देखील ताब्यात घेण्यात आली आहे.