

छत्रपती संभाजीनगर: आयटी इंजिनिअर असलेल्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या उच्चशिक्षित कन्येला हुंड्यासाठी आणि अपत्य होत नसल्याच्या कारणावरून अमानुष मानसिक व शारीरिक छळ केला. लग्नाच्या ६ वर्षांनंतर झालेल्या पोटच्या मुलाला 'एमएलडी' हा दुर्मिळ आनुवंशिक आजार झाल्यानंतर, त्याचा संपूर्ण दोषही पत्नीवरच मढवून पतीने तिला बेदम मारहाण केली आणि माय-लेकाला ऑस्ट्रेलियातून भारतात पाठवून वाऱ्यावर सोडले. याप्रकरणी सोमवारी (दि. २२) जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शिरीष जगन्नाथ खेडकर, सासरा आणि सासू राजूबाई (सर्व रा. शिवणे, वार्जे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय विवाहिता (सोनाली, काल्पनिक नाव) यांचे लग्न २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पुणे येथील शिरीष खेडकर याच्याशी जालना येथील मातोश्री लॉन्स येथे थाटामाटात झाले होते. पती शिरीष हा बेंगलोर येथे आयटी इंजिनिअर असल्याने लग्नानंतर सोनाली त्याच्यासोबत बेंगलोर व नंतर २०१८ मध्ये पुण्याच्या हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत प्रोजेक्ट मिळाल्याने पुण्यात राहण्यास आली. मात्र, लग्न होऊनही नैसर्गिकरित्या अपत्य होत नसल्याने १२ सप्टेंबर २०२० पासून पती, सासू आणि सासऱ्यांनी सोनालीला टोमणे मारत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
डॉक्टरांच्या सल्ल्याने अपत्यासाठी 'आयव्हीएफ' उपचार करण्याचे ठरले असता, "तुझ्यातच आनुवंशिक दोष आहे, त्यामुळे मी खर्च करणार नाही," असे म्हणत पतीने सोनालीला माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. मुलीचा संसार टिकावा म्हणून सोनालीचे सेवानिवृत्त न्यायाधीश वडिलांनी ५ लाख रुपये रोख दिले. मात्र, उर्वरित २० लाख रुपये न मिळाल्याने सासरच्यांनी छळाची तीव्रता अधिक वाढवली.
मुलाच्या आजारपणामुळे ऑस्ट्रेलियातून पाठवले परत
१० जून २०२२ रोजी प्रियंका यांनी मुलाला जन्म दिला. जानेवारी २०२४ मध्ये पतीला ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे प्रोजेक्ट मिळाल्याने सोनाली मुलासह ऑस्ट्रेलियाला गेल्या. मात्र,मुलगा दोन वर्षांचा झाल्यावरही सरळ बसू शकत नव्हता व त्याचा तोल जात होता. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी तपासणी करून मुलाच्या उपचाराला तिथे मोठा खर्च येईल, त्यामुळे त्याला भारतात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यावर पतीने अत्यंत निर्दयीपणा दाखवत सोनाली व आजारी मुलाला एकटेच पुण्यात पाठवून दिले आणि स्वतः ऑस्ट्रेलियातच राहिला. पुण्यात वैद्यकीय चाचण्या केल्यावर मुलाला 'एमएलडी' हा गंभीर अनुवंशिक आजार असल्याचे स्पष्ट झाले.
बेदम मारहाण आणि दुसऱ्या लग्राची धमकी
ऑक्टोबर २०२४ पासून सोनाली माहेरी राहत होत्या. दरम्यान, पती शिरीष ऑस्ट्रेलियातून मुंबईत आल्याचे समजताच सोनाली आपल्या कुटुंबासह त्याला भेटायला गेल्या. त्यांनी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली असता पतीने त्यांना शिवणे (पुणे) येथील घरी नेले. मात्र, तिथे मुलाच्या औषधोपचाराच्या खर्चावरून पुन्हा वाद घालत पतीने, सासू आणि सासऱ्यांनी सोनालीला शिवीगाळ केली.
"तुझ्यामुळेच मुलाला हा आजार झाला," असा आळ आणत पतीने सोनालीला गंभीर मारहाण केली. शेवटी ७सप्टेंबर २०२५ रोजी सोनाली यांच्या भावाने सासरी जाऊन तिची व मुलाची सुटका केली आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरला आणले. यानंतर वडिलांनी सासरच्यांशी संपर्क केला असता, "नातीच्या उपचाराचा सर्व खर्च तुम्हीच करायचा, नाहीतर आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही आणि मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ," अशी थेट धमकी सासू-सासऱ्यांनी दिली. या जाचाला कंटाळून अखेर जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. अधिक तपास हवालदार राठोड करत आहेत.