Samay Raina Supreme Court fine pudhari
राष्ट्रीय

Samay Raina SC fine : "न्‍यायालयाची दिशाभूल केली.." : सुप्रीम कोर्टाने समय रैनासह चोघांना ठोठावला प्रत्येकी ३ लाखांचा दंड

रणवीर अलाहाबादियाला खंडपीठाने सुनावले खडे बोल

नंदू लटके

Samay Raina Supreme Court fine : सर्वोच्‍च न्‍यायालयाने आज (दि. १४ जुलै) प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनासह एकूण पाच जणांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. या सर्वांना दोन आठवड्यांच्या आत ही रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वाढू शकते. सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल या सर्वांना हा दंड ठोठावण्यात आला आहे, ज्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या शो दरम्यान दोन दिव्यांग व्यक्तींना देखील सहभागी करून घेण्याचा आदेश देण्‍यात आला होता.

दिव्यांगांची उडवली होती खिल्ली

दिव्यांग व्यक्तींची खिल्ली उडवल्‍या प्रकरणी 'क्योर एसएमए इंडिया फाउंडेशन'ने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, समय रैनाने पाठीच्या कण्याच्या एका गंभीर आजाराच्या महागड्या उपचारांची चेष्टा उडवली होती. याशिवाय, या आजाराने ग्रस्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींची खिल्ली उडवल्याचा आरोपही समय रैनावर आहे. याचिकेत 'इंडियाज गॉट लॅटंट' (India's Got Latent) या शोचा होस्ट समय रैना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत जगदीश तंवर यांच्या कथित आक्षेपार्ह विनोद आणि टिप्पण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. दिव्यांगांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या ऑनलाइन कंटेंटच्या प्रसारणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये, कोर्टाने रैना आणि इतर कॉमेडियन्सना दरमहा किमान २ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून दिव्यांग व्यक्तींच्या उपचारासाठी स्थापन करण्यात आलेल्या निधीसाठी पैसे जमा करता येतील. याशिवाय त्यांना त्यांच्या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सहभागी करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

हे कसले रोल मॉडल्स?

आज सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दंडाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, "आम्हाला असे वाटते की कॉमेडियन समय रैनाने कोर्टाला गांभीर्याने घेतलेले नाही. त्याने आमच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन केले आहे." समय रैनासोबतच सर्वोच्च न्यायालयाने युट्युबर रणवीर अलाहाबादियालाही खडे बोल सुनावले. कोर्टाने म्हटले की, "हे दोघे स्वतःला तरुणांचे रोल मॉडेल समजतात. परंतु हे कोणत्या प्रकारचे 'युथ आयकॉन' आहेत, हेच मला समजत नाही." दुसरीकडे, सॉलिसिटर जनरल (SG) तुषार मेहता यांनी म्हटले की, "आमच्या तरुणांकडे यांच्यापेक्षा खूप चांगले रोल मॉडल्स आहेत."

कोर्टात नेमकं काय घडलं?

याचिकाकर्त्यांची बाजू: याचिकाकर्त्या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील अपराजिता सिंग यांनी बाजू मांडली. त्यांनी दावा केला की, समय रैनाने आपल्या शोमध्ये आमंत्रित करण्यासाठी कधीही कोणत्याही दिव्यांग व्यक्तीशी संपर्क साधला नाही. रैनाच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, दिव्यांग लोकांसाठी नऊ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यावर संस्थेच्या वकिलाने म्हटले की, "आम्हाला त्यांच्याकडून कोणतेही पैसे नको आहेत." यावर खंडपीठाने रैनाच्या वकिलाला विचारले, "तुम्ही अपराजिता सिंग यांच्या क्लायंटला बोलावून शो करायला हवा होता. आता तुम्ही त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा संदेश देत आहात. तुम्ही त्यांच्या अपंगत्वाचा वापर तुमच्या व्यावसायिक अभिव्यक्तीचा मूलभूत अधिकार दाखवण्यासाठी केला... तर त्यांच्या प्रतिष्ठेच्या मूलभूत अधिकाराचे काय?"

समय रैनाने कोर्टाची दिशाभूल केली, हा अहंकार नाही तर काय?

खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, "समय रैनाने कोर्टाची दिशाभूल केली आहे, यात आम्हाला शंका नाही. त्याने या न्यायालयासमोर दिलेल्या विधानांचे/शपथपत्रांचे उघडपणे उल्लंघन केले आहे. अनुपालन शपथपत्र (Compliance Affidavit) दाखल करण्यात आले होते, असे सांगून या गैरवर्तनावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर प्रत्यक्षात असे कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही."

आता त्यांना याचा परिणाम भोगू द्या

"त्यांना वाटते की देशाबाहेर बसून ते न्यायालयाच्या कक्षेबाहेर आहेत. आता त्यांना याचा परिणाम भोगू द्या. जर हा अहंकार नसेल, तर आपल्याला ऑक्सफर्ड डिक्शनरीच बदलावी लागेल. खंडपीठाने समय रैना आणि संबंधित लोकांना भविष्यात आपल्या वर्तनाबाबत अत्यंत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. खंडपीठाने निर्देश दिले आहेत की, त्यांनी दरमहा दिव्यांग व्यक्तींच्या प्रेरणादायी आणि यशस्वी जीवनप्रवासावर आधारित दोन कार्यक्रम किंवा शो करावेत, जेणेकरून दिव्यांग व्यक्ती, विशेषतः स्पाइनल मस्कुलर ॲट्रोफी (SMA) ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी निधी गोळा करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT