

HC Verdict On religious sentiments : "पाळीव श्वानाला देवाच्या वेशभूषेत सजवणे किंवा त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, यातून कोणत्याही पवित्र गोष्टीचा अपमान होत नाही; हे कृत्य प्रेम आणि भक्तीच्या भावनेतून केले गेले होते, कोणत्याही धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने नाही," असे स्पष्ट करत कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या पाळीव श्वानाला भगवान श्रीकृष्णाचे कपडे घालून त्याचा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी महिलेवर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश नुकताच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला.
'बार अँड बेंच'च्या वृत्तानुसार, जन्माष्टमी दिवशी आपल्या पाळीव श्वानाला भगवान श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणाऱ्या व्हॉट्सॲप स्टेटस रंजनी गौड यांनी ठेवला होता. या प्रकरणी शिवसेना युवा नेत्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस तपासावेळी गौड यांनी फोटो पोस्ट केल्याची कबुली दिली; परंतु यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावू शकतात, याची कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. आपण फक्त सण साजरा केला होता आणि आपल्या पाळीव प्राण्याला तसेच सजवले होते, जसे ती आपल्या मुलाला सजवते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्याविरोधात करण्यात आलेली कायदेशीर कारवाई रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका रंजनी गौड यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल केली होती.
न्यायमूर्ती सुभाष मेहला यांच्या एकलपीठासमोर १ जुलै रोजी संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने या गोष्टीची दखल घेतली की, "आरोपी महिलेच्या लग्नाला ६ वर्षे झाली तरी तिला मूल नव्हते आणि ती आपल्या पाळीव श्नावावर अगदी स्वतःच्या मुलासारखे प्रेम करते. श्वानाला कान्हाचे कपडे घालणे किंवा त्याचा फोटो व्हॉट्सॲपवर शेअर करणे म्हणजे कोणत्याही पवित्र वस्तूचा अपमान करणे नव्हे. हे पाऊल कोणत्याही वाईट भावनेने नाही, तर अत्यंत प्रेमापोटी उचलले गेले होते."
न्यायामूर्ती मेहला यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना म्हटले, "याचिकाकर्त्याच्या वैयक्तिक अभिव्यक्तीला केवळ यासाठी गुन्ह्याच्या कक्षेत आणता येणार नाही, कारण ती इतरांच्या संवेदनशीलतेशी जुळत नाही. कोणत्याही गुन्हेगारी उद्देशाशिवाय कायदेशीर कारवाई सुरू केली जाऊ शकत नाही. घटनात्मक सहिष्णुता ही अशा अति-संवेदनशीलतेवर वरचढ ठरली पाहिजे, निष्पाप गोष्टींनाही धर्माचा अपमान समजते."
न्यायालयाने म्हटले की, जन्माष्टमीला महिलेचे लक्ष श्रीकृष्णावर केंद्रित होते. आपल्या श्वानावर मुलासारखे प्रेम करत त्याला सजवणे हा 'भक्ती योगा'चाच एक भाग आहे. श्रीकृष्णासाठी कपडे किंवा प्रजातीपेक्षा भक्ताच्या भावनांची पवित्रता अधिक महत्त्वाची आहे.
उच्च न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९८ चे विश्लेषण करताना सांगितले की, श्वानाला घातलेले पिवळे कपडे, मुकुट आणि दागिने हे कायद्याच्या कक्षेत 'पवित्र वस्तू' ठरत नाहीत. हे कलम तेव्हाच लागू होते जेव्हा गुन्हेगारी हेतूने एखाद्या पवित्र वस्तूला नुकसान पोहोचवले जाते.
या निर्णयात भगवद्गीता, महाभारत आणि हिंदू पौराणिक कथांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने म्हटले की, भारतीय संस्कृतीत प्राण्यांवर मानवी गुण किंवा देवतांचे स्वरूप मानणे नवीन नाही. भगवान हनुमान, भगवान गणेश, गरुड आणि नंदी यांसारख्या देवता अत्यंत लोकप्रिय आहेत, ज्यांचे स्वरूप प्राणिजगताशी जोडलेले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने त्या संकुचित दृष्टिकोनातून निर्माण होतो, जो 'श्वानाला' देवाचे अशुद्ध रूप मानतो. महिलेने जे काही केले ते चांगल्या भावनेने आणि कोणत्याही द्वेषाशिवाय केले होते. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे मानत याचिकाकर्त्या रंजनी गौड यांच्यावरील एफआयआर, आरोपपत्र आणि सर्व पुढील कायदेशीर कारवाई रद्द केली.