पिता-पुत्राचा पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणी महिला हेड कॉन्‍स्‍टेबल रेवती यांची साक्ष महत्त्‍वपूर्ण ठरली.  
राष्ट्रीय

custodial death case | सत्यमेव जयते! महिला कॉन्‍स्‍टेबलचे धाडस...कोठडीतील हत्या प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा कशी झाली?

custodial death case |वरिष्‍ठांचे रेवती यांनी दाखवले 'सरकारी साक्षीदार' बनण्याचे धाडस

पुढारी वृत्तसेवा

custodial death case

मदुराई: तामिळनाडूच्या साथानकुलम येथे पोलिस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू प्रकरणी मदुराई न्यायालयाने सोमवारी (दि. ६ एप्रिल) ऐतिहासिक निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. मुथुकुमारन यांनी नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र ही शिक्षा एका महिला हेड कॉन्‍स्‍टेबलच्‍या धैर्याशिवाय अशक्‍य होती. न्याय मिळवण्यासाठी सत्याची कास धरणारे धाडस लागते, याची प्रचिती हेड कॉन्स्टेबल रेवतीमुळे पीडित कुटुंबाला आली आहे.

काय घडलं होतं?

कोराना काळात मोबाईल शॉपी सुरु ठेवल्‍याप्रकरणी जयराज आणि त्‍यांचा मुलगा बेनिक्‍स यांना १९ जून २०२० रोजी थूथुकुडी येथील साथनकुलम पोलीस ठाण्यात नेण्‍यात आले. बेनिक्स आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर, पोलिसांनी त्या पिता-पुत्राचा रात्रभर पोलिस ठाण्यात अत्यंत क्रूरपणे छळ केला. साथानकुलमच्या न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावली. दुसऱ्या दिवशी त्यांना वैद्यकीय उपचार न देताच कोविलपट्टी उप-कारागृहात ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती वेगाने खालावली. २२ जून २०२० रोजी कोविलपट्टी येथील सरकारी रुग्णालयात बेनिक्सचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी जयराज यांचेही निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात कोविलपट्टी पूर्व पोलिस ठाण्यात दोन एफआयआर (गुन्हे) दाखल करण्यात आले होते.

रेवती यांनी दाखवले 'सरकारी साक्षीदार' बनण्याचे धाडस

या प्रकरणात रेवतीने 'सरकारी साक्षीदार' बनण्याचे धाडस दाखवले. तिची स्वतःची, कुटुंबाची किंवा नोकरीची कोणतीही खात्री नसतानाही, तिने पोलीस ठाण्यात जे घडले ते दंडाधिकाऱ्यांसमोर निर्भयपणे सांगितले. आरोपी अधिकारी खूप वरिष्ठ आणि प्रभावशाली होते, तरीही एक कनिष्ठ कॉन्स्टेबल असूनही रेवती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

सर, मी तुम्‍हाला सत्‍य सांगेन...

न्यायिक दंडाधिकारी एम.एस. भरतितसन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्‍यावेळी रेवती त्यांना म्हणाली, "सर, मी तुम्हाला सर्व काही सांगेन, प्रत्येक तपशील, जे सत्य लपवले जात आहे ते सर्व; पण मी दोन लहान मुलींची आई आहे. तुम्ही माझ्या मुलांच्या आणि माझ्या नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकाल का?" असा सवालही तिने केला असल्‍याचे माध्‍यमांना सांगितले.

रेवती यांनी न्‍यायिक दंडाधिकार्‍यांना काय सांगितले?

२२ जून २०२० तारखेच्‍या रात्री पोलीस ठाण्‍यात नेमकं काय घडलं याची सविस्‍तर माहिती देताना रेवतीने सांगितले की, पिता आणि पुत्राला पोलीस ठाण्‍यात अत्‍यंत निर्दयपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे त्यांना अनेक जखमा झाल्या. रेवतीने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना न घाबरता ओळखले. यामुळे घटनास्थळी त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यास मदत झाली. हाच पुरावा गुन्हा सिद्‍ध करण्‍यासाठॅ अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला.

पिता -पुत्राचा भयंकर छळ

रेवती यांनी आपल्‍या साक्षीत नमूद केले की, "पोलीस अधिकार्‍यांनी पिता -पुत्रावर हाती लागेल त्‍या वस्‍तूंनी हल्‍ला केला. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या बुटांनी पीडितांचे गुप्तांग तुडवले. ते केवळ दारु पिण्‍यासाठीचे मारहाण थांबवत असत. मी रात्री साधारण ८:५० च्या सुमारास पोलीस ठाण्यावर पोहोचले. त्यावेळी, आतून कोणाच्यातरी किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येत होता; ती व्यक्ती ‘अम्मा, खूप दुखतंय! मला सोडून द्या! कृपया मला जाऊ द्या! माझ्याकडून खरोखरच चूक झाली!’ असे आर्तपणे ओरडत होती. या कोलाहलातच, पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केलेल्या उपनिरीक्षक बालकृष्णन यांचाही अस्पष्ट आवाज ऐकू येत होता; ते ओरडून म्हणत होते, ‘पोलीस ठाण्याच्या आत गोंधळ घालण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला स्वतःला काही मोठा समजतोस का?,”

तो क्रूरपणा पाहणे सहन होत नव्हते...

“जेव्हा मी पोलीस ठाण्‍यात पोहोचले, तेव्‍हा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पिता पुत्राला अत्यंत निर्दयपणे मारहाण करत होते. त्याचे शरीर रक्ताने माखले होते. काही वेळाने, मारहाण करून झाल्यावर पोलीस निरीक्षकानेच जखमी व्यक्तीकडून जमिनीवर सांडलेले रक्त साफ करून घेतले. असह्य छळामुळे पिता पुत्र अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेले. रेवतीने जयराजला काही हवे आहे का, अशी विचारण केली. तसेच त्याला कॉफी देऊ केली; मात्र अधिकाऱ्यांनी ती कॉफी तत्क्षणीच झटकून खाली पाडली. दोघांना पूर्णपणे विवस्त्र करण्यात आले आणि त्यांचे हात बांधले गेले, तेव्हा ती खोलीतून बाहेर पडली; कारण तो क्रूरपणा पाहणे तिला आता आणखी सहन होत नव्हते, असेही रेवती यांनी आपल्‍या साक्षीत नमूद केले होते.

वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांचा भीती झुगारली

रेवतीने साक्ष देवू नये, यासाठी वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांनी दडपण आले; पण सहकाऱ्यांनी गप्प राहण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यांची पर्वा न करता रेवती यांनी सत्‍याचा आग्रह कायम ठेवला. त्‍यांना धमक्या आणि प्रचंड दडपणाचा सामना करावा लागला; तेथील वातावरण इतके तणावपूर्ण आणि प्रतिकूल होते की, रेवतीला तिचे जबाब नोंदवता यावेत यासाठी दंडाधिकाऱ्यांना चौकशी कक्षाबाहेर विशेष रक्षक तैनात करावा लागला होता. इतके होऊनही, पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्यावर शेरेबाजी करत चौकशीच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणे सुरूच ठेवले होते. हे दडपण इतके प्रचंड होते की, सुरुवातीला रेवती आपला जबाब स्वाक्षरी करून अधिकृत करण्यास धास्‍तावली होती. अखेरीस, तिला संरक्षणाबाबत वारंवार खात्री दिल्यानंतरच तिने आपल्या जबाबावर स्वाक्षरी केली.पोलीस दलात कर्मचारी किंवा अधिकारी आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध साक्ष देण्याचे प्रसंग अत्यंत दुर्मिळ असतात. मात्र रेवतीने उचलेल्‍या पावलामुळे पीडित कुटुंबीयांना न्‍याय मिळाला.

रेवतीसह कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने दिले संरक्षण

या खटल्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात रेवतीच्या साक्षीला मोठा पाठिंबा मिळाला. तरीही त्‍यांच्‍या मनात भीती आणि धाक कायमच घर करून होता. २०२० मध्ये 'द न्यूज मिनिट'शी बोलताना, आपल्या जबाबातील तपशील सार्वजनिक होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माझा छळ व्हावा, अशी माझी मुळीच इच्छा नसल्‍याचे त्‍यांनी नमूद केले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जिल्हा प्रशासनाने त्यांना संरक्षण पुरवले; तसेच त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी दोन पोलीस शिपायांची नियुक्ती करण्‍यात आली होती. २०२० मधील एका सुनावणीदरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधला होता. सुनावणी सुरु असतानाच दूरध्वनीवरून त्यांच्याशी काही मिनिटे संवाद साधून, त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT