

उत्तर प्रदेशातील बुढाणा येथील डीएव्ही पीजी पदवी महाविद्यालयात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. केवळ ७ हजार रुपये परीक्षा शुल्क न भरल्याने २४ वर्षीय विद्यार्थी उज्ज्वल राणा याला परीक्षेला बसण्यास सक्तीने मनाई करण्यात आली. या घटनेमुळे व्यथित आणि संतप्त झालेल्या या विद्यार्थ्याने अखेर महाविद्यालयाच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले.
या गंभीर कृतीपूर्वी, त्याने महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यावर सातत्याने छळ आणि अपमान करत असल्याचा गंभीर आरोप केला. या घटनेने संपूर्ण कॅम्पसमध्ये तणाव निर्माण झाला असून, संतप्त विद्यार्थ्यांनी तात्काळ मोठे आंदोलन सुरू केले आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेपूर्वी राणा याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि एक हस्तलिखित चिठ्ठी सोडली. यामध्ये त्याने प्राचार्य प्रदीप कुमार यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. त्याने मदतीसाठी संपर्क साधला असता, पोलिसांनी आपली बाजू ऐकण्याऐवजी कॉलेज प्रशासनाची बाजू घेतली. या प्रकारामुळे आपण न्यायाच्या बाबतीत खचून गेल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, विद्यार्थी राणा याने लिहिलेल्या चिठ्ठीत कॉलेजचे प्राचार्य यांच्यासह तीन पोलिस कर्मचा-यांची नावे आहेत. या तिघांमुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले आहे.
परीक्षा फी थकबाकीवरून विद्यार्थ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या डीएव्ही कॉलेजचे प्राचार्य प्रदीप कुमार सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘विद्यार्थी राणा याने परीक्षा फीपैकी केवळ १,७५० रुपये भरले होते. आम्ही एका सत्रासाठी निम्मी फी भरून घेतो. या विद्यार्थ्याने उर्वरित फी भरलेली नाही. तसेच त्याची वर्गातील हजेरी खूप कमी आहे. त्याच्याकडे २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन आहे. तो दररोज महाविद्यालयात किमान १ लाख किंमतीच्या मोटरसायकलने येतो. मग तो गरीब कसा मानला जाऊ शकतो किंवा दलित पार्श्वभूमीतून कसा असू शकतो? जर त्याला खरोखरच फी भरणे शक्य नसेल, तर शासनाकडे अशा विद्यार्थ्यांसाठी तरतुदी आणि शिष्यवृत्ती आहेत. तो गरीब असता, तर त्याने शिष्यवृत्तीचा अर्ज का भरला नाही?,’ असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, उज्ज्वल राणा याने स्वतःवर पेट्रोल ओतत असताना शिक्षकांनी हस्तक्षेप केला नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र, सहकाऱ्यांनीच प्रसंगावधान दाखवून धाव घेतली आणि आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण या घटनेत राणा गंभीररीत्या भाजला गेला. त्याला सुरुवातीला बुढाणा येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र, नंतर मेरठ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले.
विद्यार्थी आंदोलन चिघळल्यानंतर प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलली. प्रचंड जनक्षोभामुळे अखेर पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरुद्ध बीएनएस कलम ३५१(३) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, आत्मदहन करण्यापूर्वी उज्ज्वल राणाने लिहिलेल्या चिठ्ठीत ज्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला होता, त्यांचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे, संतप्त आंदोलकांनी महाविद्यालयाच्या निष्काळजीपणा आणि छळाच्या आरोपांखाली न्यायालयीन चौकशीची मागणी लावून धरली आहे. या मागणीमुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.