Samrat Chaudhary to Become Bihar Chief Minister
पाटणा : नितीश कुमारांनी आज (दि. १४) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आमदारांच्य विधिमंडळ नेतेपदी सम्राट चौधरी यांची एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे आता सम्राट चौधरी हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट झाले आहे.
पाटणा येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विजय सिन्हा, मंगल पांडे आणि दिलीप जायसवाल यांनी भाजप आमदार दल नेतेपदासाठी सम्राट चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित आमदारांनी उत्स्फूर्त अनुमोदन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट चौधरी थोड्याच वेळात राज्यपाल लेफ्टिनेंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर करतील. सम्राट चौधरी यांच्या या निवडीमुळे बिहारच्या राजकारणात आता नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
दोन वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री बनण्यास सज्ज आहेत. भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनुसार, सम्राट चौधरी हेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री असतील. नितीश कुमार यांचीही सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती व्हावी, अशी इच्छा होती. नितीश कुमार यांच्या आग्रहास्तवच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सम्राट चौधरी यांच्या नावाला अंतिम मंजुरी दिल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात रंगली आहे.
सम्राट चौधरी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे तारापूर मतदारसंघातून सहावेळा आमदार म्हणून निवडून आले होते, तर त्यांच्या मातोश्री पार्वती देवी यांनीही विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. या राजकीय वारसामुळे सम्राट चौधरी यांचा राजकारणात अत्यंत कमी वयात प्रवेश झाला. त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रीय जनता दलातून (आरजेडी) आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
सम्राट चौधरी यांनी अल्पावधीतच राष्ट्रीय जनता पदला स्वतःचे स्थान निर्माण केले. २००० मध्ये खगरिया जिल्ह्यातील परबत्ता मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. राबडी देवी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. यानंतर त्यांची राजकीय वाटचाल विविध पक्षांतील स्थित्यंतरांनी गाजलेली. अनेक वर्षे आरजेडीमध्ये राहिल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी नितीश कुमारांच्या जनता दलात (युनायटेड) प्रवेश केला. त्यानंतर जीतन राम मांझी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले.
२०१७ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष आणि त्यानंतर २०२३ मध्ये बिहार प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. जानेवारी २०२४ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारमध्ये त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणाऱ्या बिहारच्या राजकारणात सम्राट चौधरी हे भाजपचा प्रमुख 'ओबीसी' चेहरा मानले जातात. पक्षाची रणनीती आखण्यात आणि संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या तारापूर सारख्या मतदारसंघांत त्यांनी आपली पकड मजबूत ठेवत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवला आहे.