तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी. Pudhari
राष्ट्रीय

Revanth Reddy Hitler remark |'हायड्रा'ची प्रेरणा हिटलरकडून : तेलंगणा CM रेवंत रेड्डी यांच्या विधानामुळे नवा वाद

'काँग्रेसची आणीबाणीची मानसिकता पुन्हा समोर आली' : भाजपचा हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

Revanth Reddy Hitler remark : राज्यातील अतिक्रमण विरोधी टास्क फोर्सचे नाव हुकूमशहा अडॉल्फ हिटलरकडून प्रेरित होऊन ठेवण्यात आले आहे, असे खळबळजनक वक्तव्य बंगळुरू येथे शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळेराजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून, भाजप आणि बीआरएस (BRS) या विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय महणाले CM रेवंत रेड्डी?

शनिवारी बंगळुरूतील एका परिषदेत बोलताना रेड्डी यांनी दावा केला की, 'हैदराबाद डिझास्टर रिस्पॉन्स अँड ॲसेट प्रोटेक्शन एजन्सी' (HYDRAA) चे नाव आणि त्याची संकल्पना जर्मन हुकूमशहा हिटलरच्या 'हायड्रा' या शब्दावरील कथित प्रेमातून घेण्यात आली आहे.

'हायड्रा' हा हिटलरचा आवडता शब्द होता!

"हायड्रा हा हिटलरचा आवडता शब्द होता. त्याच्या खास टीमला 'हायड्रा' म्हटले जायचे. ही टीम कोणाचीही हत्या करू शकत होती. त्यामुळे मी हिटलरकडून प्रेरणा घेऊन याचे नाव 'हायड्रा' (HYDRAA) ठेवले आहे," असे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

इतिहासतज्ज्ञांनी फेटाळला रेवंत रेड्डी यांचा दावा

इतिहासतज्ज्ञांनी रेवंत रेड्डी यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. हिटलरच्या अंतर्गत वर्तुळाचा 'हायड्रा' या शब्दाशी संबंध असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. उलट, हा शब्द नाझी जर्मनीविरुद्धच्या ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या एका बॉम्बस्फोट मोहिमेशी संबंधित होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसची आणीबाणीची मानसिकता पुन्हा समोर आली' : भाजप हल्लाबोल

रेवंत रेड्डी यांच्या या विधानानंतर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस पक्ष आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्‍लाबोल केला. भाजप नेत्याने रेड्डी यांच्यावर 'हिटलर आणि आणीबाणीची धोकादायक मानसिकता' असल्याचा आरोप केला, तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करणार का? असा सवालही उपस्थित केला.त्‍यांनी एक्‍स पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "काँग्रेसची धोकादायक हिटलर आणि आणीबाणीची मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली आहे. रेवंत रेड्डी आता उघडपणे फुशारकी मारत आहेत की हिटलरने त्यांना 'हायड्रा' तयार करण्याची प्रेरणा दिली. ही काँग्रेसची हुकूमशाही मानसिकता आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीपासून ते रेवंत रेड्डी यांच्या पत्रकार आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईपर्यंत हेच दिसून येते."

'रेवंत रेड्डी 'भारत तोडो'चा पुरस्कार करत आहेत'

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे नेतृत्व एकाच भागात केंद्रित असण्यावर आणि दक्षिण राज्यांवर असलेल्या उच्च कराच्या बोजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रादेशिक विषमतेबाबत रेवंत रेड्डी यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही पुनावाला यांनी म्‍हटलं की, "पंतप्रधान गुजरातचे आहेत. आपल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ओदिशाच्या आहेत. पण डी.के. सुरेश यांच्यानंतर आता रेवंत रेड्डी 'भारत तोडो' आणि 'तुकडे तुकडे'चा पुरस्कार करत आहेत," असे म्हणत पूनावाला यांनी रेड्डी यांची तुलना मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT