Delhi Red Fort Blast  File Photo.
राष्ट्रीय

Delhi Red Fort Blast | लाल किल्ला परिसरात बॉम्ब बनवण्यासाठी AI चा गैरवापर; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा खळबळजनक खुलासा

आरोपीचा 'अल्-कायदा'शी संबंध असल्याची माहितीही तपासात समोर

पुढारी वृत्तसेवा

Delhi Red Fort Blast

नवी दिल्‍ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीने दहशतवादी कृत्य आणि बॉम्ब बनवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) तपासात उघड झाले आहे. या आरोपीचा जागतिक दहशतवादी संघटना 'अल्-कायदा'शी संबंध असल्याचे समोर आले आहे.

एनआयएने दाखल केले ७,५०० पानांचे आरोपपत्र

गेल्या वर्षी १० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्‍लीतील कार बॉम्बस्फोट प्रकरणणी NIA ने १४ मे रोजी ७,५०० पानांचे आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील विशेष NIA न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे की, आरोपींनी आयईडी (IED) बनवण्यासाठी आणि वापरण्यासाठी अत्यंत सूक्ष्म आणि 'प्रयोगशाळेच्या दर्जाची' पद्धत अवलंबली होती.

आरोपींनी तयार केले होते रॉकेटवर आधारित IEDs

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रॉकेटवर आधारित 'इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस' (IEDs) देखील तयार केले होते आणि जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडच्या जंगलात त्यांची चाचणीही घेतली होती.

मुख्‍य आरोपीचे विविध दहशतवादी संघटनेशी कनेक्‍शन

या प्रकरणातील एक मुख्य आरोपी 'अन्सार गझवात-उल-हिंद' (AGuH) या दहशतवादी मॉड्यूलचा 'इन-हाउस इंजिनिअर' (अंतर्गत अभियंता) म्हणून काम करत होता. या संघटनेचे थेट कनेक्शन 'अल्-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' (AQIS) शी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'AQIS' आणि त्यांच्याशी संबंधित सर्व संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

'अल फलाह युनिव्हर्सिटी'च्या कॅम्पसमध्ये कटकारस्थान

आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जासीर बिलाल वानी याने २०२४-२५ दरम्यान या कटासाठी "तांत्रिक सहाय्य" पुरवण्यासाठी हरियाणातील फरिदाबाद येथील 'अल फलाह युनिव्हर्सिटी'च्या कॅम्पसमध्ये दोन ते तीन वेळा मुक्काम केला होता. या तपासानंतर ही युनिव्हर्सिटी देखील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली आहे, कारण तिथे कार्यरत असलेले तीन डॉक्टर्स या स्फोटाच्या कटात सामील असल्याचे तपासात उघड झाले आहे. डॉ. आदिल अहमद राथर याने जासीरची ओळख डॉ. उमर उन नबी याच्याशी करून दिली होती. डॉ. उमर हा स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता. या भीषण स्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.

यूट्यूब आणि चॅटजीपीटीचा वापर

NIA च्या रिपोर्टनुसार, डॉ. आदिल हा जासीरला पिठीसाखर आणि 'एनपीके' (NPK) खताच्या स्वरूपातील पोटॅशियम नायट्रेटसह इतर आयईडी साहित्य पुरवत होता. तर डॉ. उमर रॉकेट आयईडीवर संशोधन करून जासीरला मार्गदर्शन करत होता. डिजिटल आणि AI प्लॅटफॉर्मचा गैरवापर कसा केला गेला, यावर प्रकाश टाकताना आरोपपत्रात म्हटले आहे की, जासीरने यूट्यूब (YouTube) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) चा वापर करून "रॉकेट कसे बनवावे आणि त्यात मिश्रणाचे प्रमाण किती असावे," याबद्दल शोध घेतला होता.

जंगलात रॉकेट आयईडीची चाचणी

यानंतर जासीरने डॉ. उमर, डॉ. मुझम्मील शकील आणि इतर साथीदारांसह काझीगुंडच्या जंगलात या रॉकेट आयईडीची चाचणी घेतली. जासीरने दिलेल्या माहितीच्या आधारे NIA च्या पथकाने जंगलातून या उपकरणांचे अवशेष जप्त केले आहेत.

ड्रोन हल्ल्याची आणि सिलेंडर ब्लास्टचाही रचला कट

तपासात असेही समोर आले आहे की, डॉ. उमरने जासीरची क्षमता पाहून त्याला दोन ड्रोन दिले होते. या ड्रोनची उड्डाण क्षमता आणि वजन वाहून नेण्याची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्या होत्या. काश्मीर आणि देशाच्या इतर भागांतील सुरक्षा तळांवर हल्ले करण्यासाठी या ड्रोनमध्ये स्फोटके बसवून त्याचे 'शस्त्रीकरण' करण्याची त्यांची योजना होती. याशिवाय, या टोळीने अनंतनागमधील मट्टन जवळील युशमर्गच्या जंगलात सिलेंडर आधारित आयईडीची (Cylinder-based IED) चाचणी घेतली होती. याचेही अवशेष NIA ने जप्त केले आहेत.

बॉम्ब स्कॉडसमोर प्रात्यक्षिक

तपासाचा एक भाग म्हणून NIA ने घेतलेल्या नियंत्रित चाचणीत जासीरने बॉम्ब शोधक आणि नासक पथकाच्या (BDDS) तज्ञांसमोर बाजारात सहज मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून functional रॉकेट आयईडी बनवून दाखवले.

ट्रिगर मेकॅनिझमसाठी 'ऑनलाईन'वरून खरेदी

वाहन विस्फाटासाठी वापरण्यात आलेल्या ट्रिगर मेकॅनिझमबाबत फॉरेन्सिक टीमने अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान, जासीरने त्याच्या फ्लिपकार्ट (Flipkart) अकाऊंटवरून ट्रिगर मेकॅनिझमसाठी लागणारे विविध सुटे भाग ऑर्डर केले होते. यामध्ये सेन्सर-इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी स्विच, हीट गन, पीझो प्लेट, रिमोट कंट्रोल रिले-स्विच आरएफ ट्रान्समीटर आणि रिशीव्हर किट, फ्लेमलेस रिचार्जेबल पॉकेट लाइटर, सोल्डरिंग किट आणि एलईडी इलेक्ट्रॉनिक किट यांचा समावेश होता. या खरेदीसाठी डॉ. उमरने पैसे पुरवले होते आणि जासीरला कॅश-ऑन-डिलिव्हरीद्वारे या वस्तू मिळाल्या होत्या. हे सर्व भाग जोडून जासीरने ट्रिगर यंत्रणा तयार केली आणि ती उमरकडे सुपूर्द केली, ज्याचा वापर लाल किल्ल्याजवळील स्फोटात कार उडवण्यासाठी करण्यात आला.

'व्हाईट-कॉलर' डॉक्टर मॉड्यूलचा पर्दाफाश

या स्फोटात 'टीएटीपी' (TATP - Triacetone Triperoxide) या घातक स्फोटकाचा वापर करण्यात आला होता. हे स्फोटक बाजारातून कच्चा माल आणून अत्यंत गुप्तपणे प्रयोग करून तयार करण्यात आले होते. यापूर्वी श्रीनगर पोलिसांनी या स्फोटाशी संबंधित "डॉक्टर" किंवा "व्हाईट कॉलर" मॉड्युलचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक सामील होते. हे उच्चशिक्षित डॉक्टर्सच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते आणि त्यांनीच हा मोठा जिहादी कट रचल्याचे NIA च्या फॉरेन्सिक आणि सायंटिफिक तपासात पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT