

महेंद्र कांबळे
पुणे: राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन साजरा होत असताना पडघा ते पुण्यापर्यंत उघड झालेल्या कथित इसिस मॉड्यूलने राज्यातील सुरक्षा यंत्रणेसमोर दहशतवादी कारवाया पूर्णपणे संपविण्याचे मोठे आव्हान उभे केले आहे.
तरुणांचे बेनवॉश, सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरवादी विचारसरणी रुजविण्याचे केले जाणारे प्रयत्न, गुप्त बैठका आणि आयईडी चाचण्यांपर्यंत पोहचलेल्या या नेटवर्कचा पर्दाफाश करीत एनआयए, एटीएस आणि गुप्तचर विभागाने मोठा कट उधळून लावला होता. मात्र, छुप्या पद्धतीने कार्यरत असलेल्या दहशतवादी मॉड्यूल्सचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी यंत्रणांना अधिक सतर्क, आक्रमक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहण्याचे आव्हान कायम आहे.
तपास यंत्रणांनी पडघा परिसरात गुप्त बैठका, कट्टरवादी विचारसरणीचा प्रचार आणि युवकांचे बेनवॉश सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष मोहीम हाती घेतली होती. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी पडघा परिसराला कथित ‘लिबरेटेड झोन’ (स्वतःच्या नियंत्रणाखालील परिसर) घोषित करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. तपास अधिक खोलात गेल्यानंतर या नेटवर्कचे पुण्याशीही संबंध असल्याचे उघड झाले होते. पुण्यातील काही तरुणांशी संपर्क साधून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरवादी विचारांकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता. कोथरूडला पकडलेल्या तीन दहशतवाद्यांनंतर पुणे मोड्यूल उघड झाले.
त्यानंतन एनआयए आणि एटीएसने पुणे, ठाणे, मुंबई आणि भिवंडी परिसरात एकाचवेळी धाडी टाकल्या होत्या. या कारवाईत संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल, हार्डडिस्क, धार्मिक कट्टरतेशी संबंधित साहित्य तसेच आयईडी बनविण्याशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली होती. काही ठिकाणी स्फोटकांच्या चाचण्या घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण नेटवर्कवर बारकाईने नजर ठेवत पुरावे गोळा केले होते. या कारवाईत साकिब नाचनसह अनेक संशयितांना अटक केली होती. तपासात काही आरोपींचे पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर शहरातील संवेदनशील भागांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. संशयितांकडून तरुणांना ऑनलाइन माध्यमातून प्रेरित केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यासाठी एन्क्रिप्टेड ॲप्स, गुप्त चॅट ग््रुाप आणि परदेशी हँडलर्सचा वापर होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता.
एनआयएला मिळालेल्या माहितीच्या आधारे काही महिन्यांपूर्वी पुण्यात एकाच वेळी 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्या छाप्यांच्या काही दिवसांनंतर संशयित आरोपी असलेल्या हंगेकरला अटक करण्यात आली होती. नुकताच हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा प्रकार घडल्यानंतर काही मिनिटांमध्येच यत्रणांनी क्विक रिस्पॉन्स दिला होता. ही परिस्थिती स्थानिक पोलिसांसह एटीएसने युद्धपातळीवर हाताळली. यामध्ये दहशतवादी कृत्य नसल्याचे जरी समोर आले असले, तरी यंत्रणा अलर्टमोडवर राहणेही तितकेच गरजेचे असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले.