Crime News Psycho Youth Attacking Children: बंगळुरूमधील थायगराज नगर मधील पालकांनी ३५ वर्षाचा माजी जीम ट्रेनर रंजन उर्फ रणजीत हा त्यांच्या भागातील काही मुलांवर हल्ला करतोय असा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या माथेफिरू जीम ट्रेनर मुलींच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न करतो. सायकल चालवणाऱ्या मुलांचे केस ओढत होता. पुढच्या दिवशी तो मुलींचा पाठलाग देखील करत होता. त्यानं आपल्या खोपरानं या मुलींना मारलं देखील आहे.
एका पालकानं सांगितलं की, 'आम्ही याबाबतीतचं फुटेज गोळा केलं असून ते आम्ही पोलिसांकडे देखील दिलं आहे.' सर्वात गंभीर गोष्ट १४ डिसेंबर रोजी घडली. ज्यावेळी पाच वर्षाचा मुलगा आपल्या काकांच्या घरी गेला होता. तो इतर मुलांसोबत ओल्ड पोस्ट रोडवर बॅडमिंटन खेळत होता. त्यावेळी रंजन यानं त्याला लाथ घातली. यामध्ये मुलाच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्या पायाला देखील टाके पडले आहेत. जखमी झाल्यानंतर त्याला रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं.
या मुलाच्या आईने त्याच दिवशी पोलीसांकडे तक्रार केली आहे. आईने हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील गोळा करण्यात आलं आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रंजन हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे दिसून येत असून तो मानसिक स्वास्थ्यासाठी उपचार देखील घेत आहे असं सांगितलं.
ते म्हणाले, 'रंजन याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने काही मुलांवर हल्ला केल्याचे कबुल केले आहे. त्याने मुले रस्त्यावर खेळत असताना अन् ओरडत असताना त्याला त्रास होतो असा दावा केला आहे.'
रंजन हा अविवाहित असून स्थानिक रहिवासी आहे. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. त्याला अटक करण्यात आली मात्र नंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला पुढच्या उपचारासाठी मधुराई इथं घेऊन जाणार आहे.
पोलिसांनी सांगितलं की त्यांनी त्याचे वैद्यकीय रेकॉर्ड तपासणे सुरू केले असून अशा प्रकराच्या घटना रोखण्यासाठी काय उपायोजना करता येईल याचा आढावा घेतला जात आहे. पोलिसांनी पालकांना थोडं सतर्क राहण्याची देखील विनंती केली आहे.