Kolhapur Crime News: कोल्हापूर हादरलं! पोटच्या मुलानेच आई-वडिलांना संपवलं; खुरपं आणि लाकडी दांडक्याने डोकं फोडलं
हुपरी : घराची वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड, काठीने निर्दयीपणे हल्ला करून दोघांच्याही हाताची काचेने नस कापून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी येथे घडली आहे. शहरातील महावीर नगरमध्ये आज (दि. 19) पहाटे ही घटना घडली.
विजयमाला नारायण भोसले (वय ७०), नारायण गणपतराव भोसले (वय ७८) असे खून झालेल्या आई-वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर मुलगा सुनील नारायण भोसले (वय ४८) स्वतःहुन हुपरी पोलिसांत हजर झाला आहे.
नारायण भोसले पत्नी विजयमाला व हल्लेखोर मुलगा यांच्यासह महावीर नगरमधील अल्फालाईन गल्ली येथे वास्तव्यास होते. त्यांना तीन अपत्ये असुन थोरला मुलगा चंद्रकांत याचे व संजय याचे सराफी दुकान आहे. व्यवसायानिमित्ताने ते दोघेही बाहेरगावीच वास्तव्यास असतात. हल्लेखोर सुनिल याचे लग्न झाले असुन त्याला एक मुलगा व मुलगी आहे. पण त्याच्या सततच्या त्रासामुळे त्याची पत्नी मुलासह माहेरी बेळगांव येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे सुनिल हा आई वडील यांच्यासोबत राहत होता.
गेल्या कांही महिन्यांपासून घराची वाटणी करून मिळावी, या कारणावरून आई-वडिलांशी भांडण सुरू होते. घराची वाटणी करणे काही कारणाने शक्य नसल्याने आई-वडील त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे वैतागलेल्या सुनिलने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वडील झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर सुरुवातीला काठीने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर दगडाने ठेचले व खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. यावेळी नळाला पाणी आल्याने आई विजयमाला या बाहेर विद्युत मोटर सुरू करत होत्या. त्या घरात येताच सुनिलने त्यांच्यावरही हल्ला करून काचेने डोक्यात वर्मी घाव घातला व त्यानंतर काचेने त्यांच्याही हाताची नस कापली.
या घटनेनंतर सुनिल हा निवांतपणे घराबाहेर येवून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या येणाऱ्या शेजाऱ्यांना हसतमुखाने जणू काय घडलेच नाही अशा आविर्भावात हाय, हॅलो करीत होता. काही वेळानंतर तो स्वतःहुन हुपरी पोलिसांत गेला व घडल्या प्रकाराची माहिती त्याने दिली. पोलिसांनी घडल्या प्रकाराची खात्री करून त्याला ताब्यात घेतले आहे.

