Sunjay Kapur Assets Case :
नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेसाठी सुरु असणारी कायदेशीर लढाई आता तीव्र झाली आहे. आता संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी आता सून प्रिया सचदेव यांच्यावर संजय यांच्या मृत्यूनंतर कंपनी आणि मालमत्तेचा ताबा घेतल्याचा आरोप केला आहे. सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, राणी कपूर यांनी दावा केला की, संजय यांनी ०२३ मध्येच प्रिया यांना कंपनीच्या बोर्डातून काढून टाकले होते. माझा मुलगा दिवंगत उद्योगपती संजय कपूर याच्या मालमत्तेसंबंधी माहिती प्रिया सचदेवने मोठा प्रमाणात गोपनीय ठेवली आहे. संजयने आपली सर्व मालमत्ता पत्नी प्रियाला देण्याचे मृत्युपत्रही संशयास्पद असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राणी कपूर यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात केलेले आरोप सुनावणीदरम्यान महत्त्वाचे ठरले. त्यांनी म्हटले की, प्रिया सचदेव कपूर यांनी संजय यांच्या निधनाचा शोक करण्याऐवजी त्यांची मालमत्ता आणि व्यावसायिक हितसंबंधांचा ताबा घेण्यासाठी घाईघाईने पाऊले उचलली. राणी कपूर यांच्या दाव्यानुसार, संजय यांनी आपल्या सोना कॉमस्टार या कंपनीची होल्डिंग फर्म असलेल्या एआयपीएल (AIPL) मधून ३१ मार्च २०२३ रोजी प्रिया यांना काढून टाकले होते. त्यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते की, "महत्त्वपूर्ण कारणासाठी हे करणे आवश्यक आहे."
राणी यांच्या म्हणण्यानुसार, संजय यांच्या मृत्यूनंतर एका आठवड्याच्या आत प्रिया यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून पदभार स्वीकारणे आणि त्यानंतरच्या आठवड्यात संचालक म्हणून आपले स्थान पुन्हा मिळवणे, ही बाब संजय यांच्या मूळ निर्णयाशी विसंगत आहे. संजय यांनी केलेल्या कोणत्याही 'विल' (मृत्युपत्रा) बद्दल त्यांना कोणतीही माहिती नव्हती. प्रिया यांनी सादर केलेले दस्तऐवज खोटे असण्याची शक्यता आहे, कारण ते "आयुष्यभर संजय यांनी आईचे (राणी कपूर) सर्वकाही देणं लागतो, हे मान्य करण्याच्या" त्यांच्या भूमिकेशी सुसंगत नाही. राणी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, “जर खरोखरच त्यांना मला वगळायचे असते, तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगितले असते.”
अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या दोन मुलांनी त्यांच्या वडिलांच्या ( संजय कपूर) मालमत्तेवर प्रिया कपूर यांनी कोणताही तृतीय-पक्ष हक्क निर्माण करू नये म्हणून दाखल केलेल्या अंतरिम प्रतिबंध अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. ज्येष्ठ वकील वैभव गग्गर यांनी राणी कपूर यांच्या वतीने युक्तीवाद करताना सांगितले की, "संजय कपूर यांचा फक्त एकाच कंपनीतून वार्षिक पगार ६० कोटी रुपये मिळत होता. तरीही त्यांचा बँक बॅलन्स दोन कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. क्रिप्टो मालमत्ता सुमारे १.२९ कोटी रुपये आहे. दिल्लीतील राजोकरी भागातील फार्महाऊस माझ्या दिवंगत पतीने बांधले आहे. तिथे ५० हून अधिक कलाकृती आहेत. संजय कपूर यांचा जीवन विमा नव्हता, भाड्याचे उत्पन्न नव्हते आणि म्युच्युअल फंड नव्हते? फक्त त्यांचा वार्षिक पगार ६० कोटी रुपये होता. खात्यात फक्त ₹१.७ कोटी आहेत. प्रिया कपूरने न्यायालयापासून मालमत्तेचा तपशील लपवला आहे. संजय कपूर यांचा पैसा परदेशात नेण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
गग्गर यांनी न्यायालयाला विनंती केली की, प्रिया कपूर यांना मागील दोन वर्षांचे त्यांचे आणि संजय कपूर यांच्या मालमत्तेचे तपशील सादर करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच, 'जैसे थे' परिस्थिती कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश त्वरित पारित करावा, अशी मागणीही वकील वैभव गग्गर यांनी केली.
पती आपली वैयक्तिक मालमत्ता पत्नीला देतात ही कपूर कुटुंबाची परंपरा आहे. संजय कपूर यांच्या वडिलांनीही त्यांची संपूर्ण मालमत्ता राणी कपूर यांच्या नावावर केली होती. प्रिया कपूर यांचे संजय कपूर यांच्याशी केवळ सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचे संजय कपूर यांचे तिसरे तर त्यांचे (प्रिया यांचे) दुसरे लग्न होते. मी माझ्या पतीसोबत चाळीस वर्षे संसार केला. आमचे मृत्युपत्र नोंदणीकृत होते. संजय कपूर यांच्या निधनानंतर प्रिया कपूर यांनी मालमत्ता आणि सोना कॉमस्टार (Sona Comstar) या कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.